- परसबाग स्पर्धेत ‘उत्तेजनार्थ पारितोषिक’; शिक्षण, श्रमसंस्कार आणि पर्यावरणाचा आदर्श संगम
सोनगाव : राहुरी तालुक्यातील दिघेवस्ती (धानोरे) येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पर्यावरणपूरक शिक्षणाचा आदर्श निर्माण करत पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत आयोजित उत्कृष्ट परसबाग स्पर्धा २०२५-२६ मध्ये ‘उत्तेजनार्थ पारितोषिक’ पटकावत शाळेने तालुक्याचा मान उंचावला आहे.
विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमातून आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून उभी राहिलेली ही परसबाग म्हणजे केवळ भाजीपाला उत्पादन नव्हे, तर शिक्षणाचा जिवंत प्रयोग ठरला आहे. शाळेच्या परिसरात विविध भाज्यांची लागवड करत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्रमातून निसर्गाशी नाते जोडले. या उपक्रमातून स्वावलंबन, श्रमसंस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला जात आहे.
या यशामागे मुख्याध्यापक प्रभाकर शिंदे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व महत्त्वाचे ठरले. शिक्षकवृंद अनिल घोलप, संजय बोकंद, लता खराडे, सचिन पारेकर, वंदना कोरुलकर, सोमनाथ अनाप यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत उपक्रम यशस्वी केला. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांच्या एकजुटीने परसबाग बहरली.
या उपक्रमाला गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे, शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री कार्ले, इंदुमती देवरे, नंदा गवळी तसेच केंद्रप्रमुख विद्या भागवत, निलिमा गायकवाड, रविंद्र बोरुडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. बीआरसी अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थांनी शाळेच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
“शाळा म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते शिक्षण नसून, जीवन घडवणारी प्रयोगशाळा आहे,”
दिघेवस्ती शाळेची ही हरित वाटचाल आता इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत असून, ‘गाव-शाळा-विद्यार्थी’ यांच्या एकत्रित प्रयत्नातून शिक्षणाला नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरत आहे.











