बंड्या मारूती अमृत महोत्सवी अखिल भारतीय व्यावसायिक गट कबड्डी
मुंबई :- बंड्या मारूती सेवा मंडळाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय पुरुष व्यवसायिक कबड्डी स्पर्धेत मुंबईच्या युनियन बँकेने प्रथम बाद फेरी गाठली, तर तामील थलाईवास हा संघ साखळीतच गारद झाला. बंड्या मारूती संघाने आपल्या अमृत महोत्सवी वर्ष आणि हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे मॅटच्या एका क्रीडागणावर झालेल्या दुसऱ्या दिवशी ड गटात मुंबईच्या युनियन बँकेने रेड आर्मी संघाला ५१-४२ असे नमवीत साखळीत सलग दुसरा विजय मिळवीत बाद फेरी गाठली. झंझावाती सुरवात करीत पूर्वार्धात ३ लोण देत ३२-१५ अशी आघाडी घेणाऱ्या बँकेने नंतर सावध खेळ करीत आपला विजय साकारला. या सावध खेळाचा लाभ उठवीत रेड आर्मीने एका लोणची परतफेड करीत सामन्यात रंगत आणली. पण विज्यापासून ते वंचित राहिले. बँकेच्या सुशील खांबरेने चढाईत २० गुण घेत यात महत्वाचा वाटा उचलला. रोहन तुपारेने ४ पकडी घेत त्याला उत्तम साथ दिली. रेड आर्मी कडून पंकजकुमारने चढाईत १८ गुण घेत, तर अनुरागने ३ पकडी घेत सामन्यात रंगत आणली. भारतीय नौदालने क गटात पहिल्या डावातील १९-२१ अशा पिछाडीवरून तामील थलाईवासचा प्रतिकार ५०-३८ असा मोडून काढला. या पराभवाने तामील थलाईवासचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. भरत चढाईत ११ गुण व सुरजीतच्या ४ पकडीने नौदलाने ही किमया साधली. गौरव व राहुल खत्री यांचा पहिल्या डावातील जोश दुसऱ्या डावात टिकला नाही. पुण्याच्या डी. पी. यु. संघाला ई गटात एक पराभव व एक बरोबरी साधता आली. मिडलाईनने अ गटात गुजरातच्या ओ. एन. जी. सी.ला ४४-४३ असे चकवित बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात अखेर मिडलाईनने बाजी मारली. विश्रांतीला २४-२२ अशी मिडलाईनकडे आघाडी होती. हर्षने चढाईत २२गुण घेत या विजयात सिंहाचा वाटा उचलला. अमनने ४ पकडी करीत त्याला छान साथ दिली. ओ. एन. जी. सी. च्या अंकित दहियाने चढईत ९गुण घेत, तर संजयने ६ पकडी घेत निकराची लढत दिली. दक्षिण मध्य रेल्वेने ब गटात मुंबई पोस्टल वर ४८-३१ अशी मात केली. मध्यंतरापर्यंत एक लोण देत २६-१७ अशी आघाडी घेणाऱ्या रेल्वेने नंतर देखील आपल्या खेळातील जोश कायम राखत आणखी एक लोण देत हा विजय साकारला. रेल्वेच्या विजयात आर्यन लोचन यांने चढईत १७ गुण घेतले, तर नितेश कुमारने ४ पकडी केल्या. रेल्वेने पूर्ण डावात १२ बोनस गुण वसुल केले. पोष्टाच्या अर्जुन धंदासने चढाईत १६ गुण घेत, तर कृष्णा जगतापने ७ पकडी केल्या. त्यांनी २ अव्वल पकड देखील केल्या. पण विजय त्यांच्या पासून दूरच राहिला. या पराभवाने पोष्ट साखळीतच गारद झाले. पहिल्या सामन्यात डी. पी. यु.ला तामीळ क्लबने ४०-४० अशा बरोबरीत रोखले. तर दुसऱ्या सामन्यात यु. पी. योद्धाने त्यांना ५०-२० असे नमविले. अधिक माहितीकरिता संपर्क जितेश सापते 8082089159. मंगेश घेगडे 9870509673.








