नेवासा : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे ग्रामदैवत श्री गहिनीनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाची सांगता पारंपरिक कुस्तीच्या आखाड्याने मोठ्या उत्साहात करण्यात आली. सर्वधर्मीय ग्रामस्थांच्या सहभागातून साजरा होणारा हा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तीभाव आणि जल्लोषात पार पडला.
ग्रामस्थांच्या स्वेच्छा देणगीतून अनेक वर्षांची परंपरा जपत हा उत्सव साजरा केला जातो. यात्रेनिमित्त गंगाजल मिरवणूक, जलाभिषेक, झेंडा व छबीना मिरवणुका, आतिषबाजी, तमाशा, ऑर्केस्ट्रा तसेच कुस्त्यांचे सामने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या या उत्सवाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. विशेषतः महिलांची मोठी उपस्थिती असल्याने संसारोपयोगी वस्तू आणि खेळण्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली. यामुळे अनेक व्यावसायिकांनीही यात्रेच्या निमित्ताने व्यवसाय उभारला होता.
यात्रेच्या वाढत्या व्याप्तीमागे ग्रामस्थांकडून मिळणाऱ्या देणगीचे मोठे योगदान असल्याचे नमूद करत देणगीदारांचे आभार मानण्यात आले. यावेळी अशोक कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे, सरपंच वामनराव तुवर, माजी सरपंच दिगंबरराव नांदे यांच्यासह रमेश राजगुरू, अविनाश सोनवणे, शशिकांत मतकर, श्रीकांत पवार, दत्तात्रय पाटील, भगीरथ पवार, पंढरीनाथ शिंदे, दिगंबर तुवर आणि ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते.
कुस्तीच्या आखाड्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात विजेत्यास ५,१०० रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या वेळी अमोल शिंदे, सचिन शिंदे, दीपक शिंदे, मंजाबापू माळी, दत्तात्रय पवार, उमेश कहार, सोमा मोरे, संदीप नांदे, गोकुळ तुवर, संदीप पाटील, दिगंबर कहार, कृष्णा पंढुरे, प्रभाकर तुवर, अशोक मतकर, गंगाधर मतकर, डॅनियल देठे आणि अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. यात्रेदरम्यान पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तीन दिवस चोख बंदोबस्त ठेवत कार्यक्रम शांततेत पार पाडला.
पाचेगावातील गहिनीनाथ महाराज यात्रा उत्सवाची कुस्तीच्या आखाड्याने उत्साहात सांगता








