- टागोर नगर मित्र मंडळ जिल्हास्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा
मुंबई: शूर जवान, गुरुदत्त मंडळ, नवरत्न मंडळ, विक्रोळी यांनी टागोर नगर मित्र मंडळाने आयोजित केलेल्या पुरुष गटात विजयी सलामी दिली. महिला गटात एस. आय. ई. एस. उपांत्य फेरी गाठली. विक्रोळी पूर्व येथील साईबाबा मंदिर शेजारील मैदानातील मॅट वर झालेल्या उदघाटनिय सामन्यात मुलुंडच्या शूर जवान मंडळाने चेंबूरच्या यंग स्टार स्पोर्टस् चा २२-१३ असा पाडाव केला. पूर्वार्धात एकमेकांचा अंदाज घेत खेळ केल्याने सामन्यात चूरस पहाण्यास मिळाली. पूर्वार्धात ९-७ अशी आघाडी घेणाऱ्या शूर जवानने उत्तरार्धात आपला खेळ अधिक गतिमान करीत ९गुणांनी आपला विजय साकारला. निखिल चौहानच्या चढायांना निशांत वाळुंजे याची मिळालेली पकडीची साथ त्यामुळे हे शक्य झाले. यंग स्टारचा कुणाल गायकवाडने पूर्वार्धात कडवी लढत दिली. विक्रोळीच्या गुरुदत्त मंडळाने रोहन देवरे, अभिषेक मोरे यांच्या चढाई पकडीच्या उत्तम खेळाने घाटकोपरच्या नवरत्न मंडळावर ३८-१८ अशी सहज मात केली. विश्रांतीला १८-०७ अशी भक्कम आघाडी गुरुदत्त कडे होती. नवरत्नचा विवेक बेंद्रे बरा खेळला.
विक्रोळीच्या नवरत्न मंडळाने चेंबूरच्या शितलादेवी मंडळाला ३५-१२ असे नमवीत दुसरी फेरी गाठली. मध्यंतराला १३-०९ अशी नाममात्र आघाडी नवरत्न कडे होती. मध्यंतरानंतर नवरत्नने टॉप गिअर टाकत आपला विजय विजय सोपा केला. त्यांच्या सुमित गुडदे यांनी दोन वेळा एकाच चढाईत ३ गाडी टिपण्याचा पराक्रम केला. त्याला रोहन शेडगे, गौरव पाटील यांनी बचावाची बाजू भक्कम सांभाळत उत्तम साथ दिल्याने हा विजय शक्य झाला. महिलांच्या सामन्यात एस. आय. ई. एस. स्पोर्टस् ने हिड इंडिया स्पोर्टस् चा प्रतिकार २४-१८ असा मोडून काढत उपांत्य फेरीत धडक दिली. आस्था सिंग, वैष्णवी नाडार यांच्या सुरवातीच्या झंझावाती खेळाच्या जोरावर एस. आय. ई. एस. ने लोण देत १६-०८ अशी आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावात हिड इंडियाच्या कोमल यादव, दीपा बुरटे यांच्या तुफानी खेळाने सामना रंगदार अवस्थेत नेला. पण संघाला विजयी करण्यात त्या कमी पडल्या. या अगोदर झालेल्या सामन्यात एस. आय. ई. एस. ने सत्यम सेवा संघाला ३४-०९ असे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. या स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला सचिव सुचिता माने, मंडळाचे अध्यक्ष मनोज पवार, सचिव सुरेश परब, सदस्य शोभा दूधवडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
अधिक माहितीकरिता संपर्क :- गिरीश पवार – 9867146345.








