टी२० मुंबई महिला लीगची दणक्यात सुरुवात
मुंबई : वानखेडे स्टेडियमवर पहिल्या नुवामा प्रायव्हेट टी२० मुंबई महिला लीगला मंगळवारी सुरुवात झाली आणि मुंबई क्रिकेटच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला गेला. भारताची स्टार खेळाडू सायली सातघरेने निर्णायक तीन बळी घेत सोबो मुंबई फाल्कन्स संघाचे नेतृत्व केले आणि स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात ठाणे स्काय रायझर्सवर १६ धावांनी दणदणीत विजय मिळवत आपल्या मोहिमेची सुरुवात केली.
१७४ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना, नियमित अंतराने फंलदाज गमावूनही सलामीवीर मानसी पाटीलने (४६) ठाणे स्कायरायझर्ससाठी धावांचा पाठलाग जिवंत ठेवला. महक पोकार (२३ दुखापतग्रस्त होऊन निवृत्त) आणि सायमा ठाकोर (२९) यांनी आश्वासक सुरुवात केली, पण सातघरेच्या उत्कृष्ट नेतृत्वाखालील फाल्कन्सच्या गोलंदाजीने विरोधी संघावर कायम दबाव ठेवला होता. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात, यष्टीरक्षक खुशी भाटियाने केवळ १६ चेंडूंमध्ये २८ धावांची दमदार खेळी करत ठाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, शेवटच्या षटकांत ती बाद झाल्याने स्कायरायझर्सच्या विजयाच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आणि सामना निर्णायकपणे फाल्कन्सच्या बाजूने झुकला.








