शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

रविंद्र माणगावे अध्यक्षपदी बिनविरोध तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी करुणाकर शेट्टी यांचा दमदार विजय

---Advertisement---
  • 99 वर्षांच्या इतिहासात विदर्भातून प्रथमच उपाध्यक्षपदाची निवडणूक
  • शताब्दीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र चेंबरची ऐतिहासिक झेप लोकशाहीचा नवा आदर्श निर्माण!

मुंबई : शताब्दी वर्षाच्या दिमाखदार उंबरठ्यावर उभ्या असलेल्या महाराष्ट्राच्या सर्वात प्रभावी व्यापारी, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील शिखर संस्थेने लोकशाहीची भक्कम परंपरा पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) च्या 2026-28 कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुका उत्साह, शिस्त, पारदर्शकता आणि सदस्यांच्या अभूतपूर्व सहभागाच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडल्या. सुमारे 7,000 थेट सदस्य व 20 लाखांहून अधिक व्यापारी, उद्योजक आणि औद्योगिक घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेने शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर लोकशाहीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

व्यापारविश्वाचा विश्वास कायम; रविंद्र माणगावे अध्यक्षपदी
महाराष्ट्र चेंबरवर रविंद्र माणगावे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून सदस्यांनी त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून ही निवड पाहिली जात आहे. राज्यातील आर्थिक विकासाला अधिक गती देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र चेंबर आणखी प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘रोड रोलर’ विरुद्ध ‘विमान’; रंगली चुरशीची लढत
यंदाच्या निवडणुकीत ‘एकता पॅनेल’ (रोड रोलर) आणि ‘प्रगती पॅनेल’ (विमान) यांच्यात अत्यंत अटीतटीची आणि लक्षवेधी लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीने सदस्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी करुणाकर शेट्टी यांनी 1885 मतांनी विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली.

तीन विभागांत दमदार विजय; नव्या नेतृत्वाची एंट्री
उपाध्यक्षपदासाठी पुढील उमेदवारांनी सुध्दा विजय संपादन केला. सुनिता फाल्गुने (नाशिक), संतोष राणे (कोकण) व महेंद्र अगरवाल (उत्तर महाराष्ट्र) या विजयामुळे विविध विभागांना सक्षम आणि समन्वय साधणारे नेतृत्व मिळाले आहे.

सहा उपाध्यक्ष बिनविरोध; संघटनात्मक एकतेचे दर्शन
पुढील पदाधिकाऱ्यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली :डॉ. धनश्री हरदास (मुंबई-1), किरण भोसले (मुंबई-2), संजय शेटे (पश्चिम महाराष्ट्र-1), सरजेराव नलावडे (पश्चिम महाराष्ट्र-2), संजय किर्दत (मराठवाडा), सिद्धार्थ रुहाटिया (विदर्भ). मुंबई विभागातून २० गव्हर्निंग कौन्सिल सदस्य बिनविरोध निवडून आले असून त्यांच्यासह विविध विभागांतील गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली. यामुळे संस्थेतील एकजूट आणि परस्पर सहकार्याची भावना अधोरेखित झाली.

99 वर्षांच्या इतिहासात प्रथमच घडला ऐतिहासिक क्षण
यंदाच्या निवडणुकीतील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र चेंबरच्या तब्बल 99 वर्षांच्या इतिहासात प्रथमच विदर्भ विभागातून उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. हा क्षण केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून, राज्यातील सर्व विभागांना समान प्रतिनिधित्व देण्याच्या दिशेने उचललेले ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.

शांत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध निवडणूक प्रक्रियेचा आदर्श
मुख्य निवडणूक अधिकारी तथा सरचिटणीस सुरेश घोरपडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततापूर्ण, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. 11 ते 13 जून 2026 दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली, तर 15 जून रोजी मतमोजणी उत्साहपूर्ण वातावरणात पूर्ण झाली.

शताब्दी वर्षाकडे दमदार वाटचाल; महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला नवी ऊर्जा
शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर पार पडलेली ही निवडणूक महाराष्ट्र चेंबरच्या लोकशाही मूल्यांचा, सदस्यांच्या सक्रिय सहभागाचा आणि संस्थेच्या वाढत्या प्रभावाचा महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरली आहे. नव्याने निवडून आलेले पदाधिकारी आणि गव्हर्निंग कौन्सिल सदस्य यांच्या नेतृत्वाखाली व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र चेंबर अधिक वेगाने, अधिक प्रभावीपणे आणि अधिक व्यापक दृष्टीकोनातून कार्य करेल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment