शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

रौनक, ऋषिकेश, योगेश, अजिनाथ, प्रशांत ठरले “स्ट्रॉग मॅन” किताबाचे मानकरी

---Advertisement---

मुंबई : महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनची इक्विप गटाची राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयात उत्साही वातावरणात पार पडली. सिनियर, ज्युनिअर, सब ज्युनिअर, मास्टर्स पुरुष व महिला आणि अंध व गतिमंद दिव्यांग अशा विविध गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पुरुष गटात रौनक जितेकर, ऋषिकेश तेली, योगेश गुंड, अजिनाथ शेखाडे, प्रशांत जगताप यांनी आपापल्या गटात “स्ट्रॉग मॅन” किताबाचा मान मिळवला. तसेच महिलांमध्ये गायत्री बडेकर, शिफा शेख, प्रेरणा साळवी, डॉ. शर्वरी इनामदार, रुबी दास या “स्ट्रॉग वुमन” किताबाच्या मानकरी ठरल्या.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील अनेक नामवंत पुरुष, महिला खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री आणि क्रीडाप्रेमी आमदार कालिदास कोळंबकर यांनी केले. स्पर्धेला विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी सदिच्छा भेट दिली. तदप्रसंगी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने सचिव संजय सरदेसाई यांनी शक्ती देवता हनुमंत यांचे शस्त्र ”गदा’ प्रतिकात्मक देऊन त्यांचा गौरव केला. भविष्यात कोकण क्षेत्रात सुद्धा भव्य दिव्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजन करण्याची इच्छा आमदार जठार यांनी व्यक्त केली. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला सायन हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर ऋषिकेश मालावे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अपर्णा घाटे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दिपाली जळगावकर, क्रीडा कार्यकारी अधिकारी प्रीती टेमघरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे जुन्या जाणत्या पुरुष व महिला खेळाडूंना आणि क्रीडा पत्रकारांना “जीवन गौरव” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावेळी माजी खेळाडू “शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सौ. आशा नागेश पुजारी” (मुंबई) आणि राष्ट्रीय पंच, आंतरराष्ट्रीय पदक विजेते, “देवदत्त मनीबाई मार्तंड भोईर” यांना “जीवन गौरव” पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट पंच म्हणून प्रथम क्रमांक जितेंद्र यादव, द्वितीय क्रमांक सुनील अडसूळ, तृतीय क्रमांक ऋत्विका सरदेसाई (सर्व मुंबई) यांनी मिळवला.

या स्पर्धेतील “स्ट्रॉग मॅन” किताबाचे मानकरी
पुरुष गट – १) सब ज्युनिअर मुले – रौनक जितेकर (रायगड), २) ज्युनियर – ऋषिकेश तेली (सिंधुदुर्ग), ३) सीनियर – योगेश गुंड (मुंबई शहर), ४) मास्टर १ – अजिनाथ शेखाडे (संभाजीनगर), ५) मास्टर २ – प्रशांत जगताप (पुणे).

स्ट्रॉंग वुमन महिला गट – १) सब ज्युनिअर गायत्री बडेकर (रायगड), २) ज्युनियर शिफा शेख (मुंबई उपनगर), ३) सीनियर प्रेरणा साळवी (ठाणे), ४) मास्टर१ डॉक्टर शर्वरी इनामदार (पुणे), ५) मास्टर २ रुबी दास (मुंबई)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment