नवी मुंबई : नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने १३ ते १६ एप्रिल २०२६ दरम्यान नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी येथे ६० वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२६-२०२७ आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेली हि स्पर्धा पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष वयस्कर एकेरी ( ५० वर्षांवरील ), महिला वयस्कर एकेरी ( ५० वर्षावरील ) तसेच पुरुष व महिला सांघिक गटात खेळवली जाणार आहे. गतवर्षी अतिशय भव्यरित्या वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनने आयोजित केली होती आणि म्हणून सलग दुसऱ्या वर्षीहि या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान त्यांना मिळाला आहे. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या दुसऱ्या मजल्यावरील वातानुकूलित हॉलमध्ये हि स्पर्धा रंगणार असून सिस्का कंपनीचे एकावेळी ३२ बुलेट शॉट कॅरम व बुलेट सोंगट्या स्पर्धेत वापरण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्यांना १ लाख ९० हजारांची रोख बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात येणार असल्याने स्पर्धेत अधिक चुरस पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील विश्व् विजेते योगेश परदेशी, प्रशांत मोरे, संदीप दिवे यांच्यासहित आंतर राष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू महम्मद घुफ्रान, अभिजित त्रिपनकर, योगेश धोंगडे, झैद अहमद फारुकी, रियाझ अकबर अली, प्रकाश गायकवाड, संजय मांडे, अनिल मुंढे, राजेश गोहिल, दिलेश खेडेकर, जितेंद्र काळे, अशोक गौर, हिदायत अंसारी, नरसिंगराव सकारी, अशोक गौर, सुहास पोमेंडकर, अफझल खान, पंकज पवार, सागर वाघमारे, रहीम खान, विकास धारिया व महिलांमध्ये काजल कुमारी, निलम घोडके, आकांक्षा कदम, अंबिका हरिथ, आयेशा महम्मद, संगीता चांदोरकर, अनुपमा केदार, समृद्धी घाडीगावकर, मधुरा देवळे सारख्या दिग्गज खेळाडूंचा खेळ जवळून बघण्याची संधी वाशीकरांना मिळणार आहे. शिवाय महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून या स्पर्धेतील महत्वाच्या सामन्यांचे थेट प्रसारण करण्याची व्यवस्था महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने केली आहे. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व वनमंत्री, महाराष्ट्र राज्य, श्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हि स्पर्धा रंगणार असून उपाध्यक्ष, विजय एस पाटील, सचिव, विजय आर पाटील व स्पर्धा समन्वयक, प्रकाश श्रीनिवासन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने प्रमुख पंच म्हणून आंतर राष्ट्रीय पंच केतन चिखले व आशिष बागकर तर स्पर्धेचे तांत्रिक संचालक म्हणून आंतर राष्ट्रीय पंच अजित सावंत यांची नियुक्ती केली आली आहे. नवीन वर्षात प्रथमच सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे खास तयार केलेला एक टी शर्ट स्पर्धेत खेळण्यासाठी देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध असून भाग घेण्यासाठी खेळाडूंना प्रथम ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल. त्यानंतर खेळाडूंनी आपली नावे आपल्या जिल्यामार्फत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे दिनांक ३ एप्रिल २०२६ पर्यंत नोंदवावीत असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.








