(अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी शरदचंद्रजी पवार साहेब यांचेमार्फत देणगी)
श्रीरामपूर : रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय, कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयास रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व या विद्यालयाचे माजी विद्यार्थी शरदचंद्रजी पवार साहेब यांनी ५० लाख रुपयांची देणगी मिळवून दिली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ हे महात्मा गांधी विद्यालय, कन्या विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने विद्यालयात जून २०२६ मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून या विद्यालयाची गुणवत्ता, भौतिक सुविधांची आणि निकालाच्या उत्कृष्ट परंपरेची माहिती प्राचार्य विनायक मेथवडे यांनी शरदचंद्रजी पवार साहेबांना मुंबई येथील बैठकीत दिली. या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू, मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य व या विद्यालयाचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के, जनरल बॉडी सदस्य एकनाथराव घोगरे, जनरल बॉडी सदस्य ॲड. संदीप वर्पे हे उपस्थित होते. पवारसाहेब यांनी विद्यालयाच्या प्रगती आणि गुणवत्तेची माहिती घेत आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांनी अमृत महोत्सवी वर्ष उपक्रम व माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याबाबत मार्गदर्शन केले व निमंत्रण स्वीकारले. बारामती येथील बारामती स्क्रॅप अँड वेस्ट मॅनेजेन प्रायव्हेट लिमिटेड यांचेकडून ही देणगी शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महात्मा गांधी विद्यालयास प्राप्त करून दिली. यावेळी बारामती स्क्रॅप अँड वेस्ट मॅनेजेन प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख नितीन धोंडे यांनी ५० लाख रुपयांचा धनादेश रावसाहेब म्हस्के आणि प्राचार्य विनायक मेथवडे यांच्याकडे सुपूर्द केला. पवार साहेब यांनी यापूर्वीही कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तीन लाख रुपये डिपॉझिटमधून विशेष गुणवत्ता शिष्यवृत्ती ठेवली आहे. पवार साहेबांच्या या दातृत्वातून विद्यालयाप्रती आपुलकी आणि ऋणानुबंध दिसून येतो. पवार साहेबांनी दिलेल्या या भरीव योगदानातून विद्यालयाच्या गुणवत्तेसह संकुलात बहुउद्देशीय सभागृह उभारणीसाठी ही आर्थिक मदत होणार आहे. याप्रसंगी रयत बँकेचे व्हाईस चेअरमन उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, डॉ. शरद दुधाट, बाबासाहेब अंत्रे, ॲड. सुरज म्हस्के, अनुप म्हस्के, विकास हुरुळे हे उपस्थित होते. ही देणगी मिळविण्यासाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व या विद्यालयाचे माजी विद्यार्थी रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, एकनाथराव घोगरे, माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्राचार्य विनायक मेथवडे यांनी विशेष प्रयत्न केले. या विविध उपक्रमांसाठी अनेक माजी विद्यार्थ्यांकडून योगदान मिळत आहे.











