सोनगाव : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या रयत शैक्षणिक संकुलात नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा आणि दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. माजी केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. चांगदेवराव दिघे होते. संकुलाचे प्राचार्य सिताराम गारुडकर यांनी स्वागत करून उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. रयत सेवक संघाचे सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर यांनी प्रास्ताविकात “सन्मानातून कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळते,” असे सांगत रयतच्या कार्यपरंपरेचा गौरव केला.
यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झालेल्या अरुण कडू पाटील यांच्यासह मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी संदीपजी वर्पे, सुरेशजी बोळीज, राजेंद्रजी चांदे तसेच जनरल बॉडी सदस्यपदी किरण कडू पाटील यांचा शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला.
दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. विविध संस्था, पतसंस्था, सोसायट्या व मित्रपरिवाराकडूनही मान्यवरांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुरेशजी बोळीज यांनी रयत शिक्षण संस्थेच्या घटनेविषयी माहिती देत शिक्षण क्षेत्रात अधिक भरीव कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. संदीपजी वर्पे यांनी सामान्य, शोषित, शेतकरी आणि कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचा वारसा पुढे नेण्याची ग्वाही दिली.
उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रयत शिक्षण संस्थेच्या संघर्षमय इतिहासाची आठवण करून देत शिक्षक व विद्यार्थ्यांचे हित जपणे किती आवश्यक आहे हे अधोरेखित केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून पदरमोड करून संस्थेसाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार कॉ. पी. बी. कडू पाटील यांच्या कार्याची आठवण सांगत रयतची परंपरा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
या सोहळ्यास रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजयराज कडू पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य संदीपजी वर्पे, सुरेशजी बोळीज, राजेंद्रजी चांदे, जनरल बॉडी सदस्य किरण कडू पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर डुक्रे, विविध समित्यांचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास तांबे व सचिन पलघडमल यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण कडू पाटील यांनी मानले.
रयतच्या नव्या नेतृत्वाचा सात्रळमध्ये जल्लोष,गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, पदाधिकाऱ्यांच्या सत्काराने रयत संकुल दुमदुमले











