- आमदार चषक कबड्डी स्पर्धा झाली रंगतदार
- पाच-पाच चढायांच्या संघर्षात आयएसपीएलची बीपीसीएलवर मात
मुंबई : आयएसपीएलने (इन्शुअरकोट स्पोर्ट्स)चार दिवसांपूर्वी झालेल्या पराभवाच्या जखमेवर आमदार चषक स्पर्धेच्या जेतेपदाचे मलम लावण्याचा पराक्रम केला. प्रभादेवीतील अंतिम सामन्यात बीपीसीएलकडून झालेल्या पराभवाचा बदला घेत त्यांनी एका झटक्यात आपला हिशेबही चुकता केला. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत आयएसपीएल आणि बीपीसीएल यांच्यात झालेल्या जेतेपदाच्या संघर्षाने उपस्थित कबड्डीप्रेमींचे हृदयाचे ठोकेच चुकवले नाही तर हॉलीवूडच्या अॅक्शनपटाला साजेसा थरारक क्लायमॅक्स सादर केला. पाच-पाच चढायांच्या क्लायमॅक्समध्ये आयएसपीएलने बीपीसीएलवर ९-४ (४६-४१) अशी मात केली. हे आयसएपीएलचे हंगामातील चौथे जेतेपद ठरले आहे.
विक्रोळी पूर्वला टागोर नगरातील डॉ. आंबेडकर उद्यानात उभारलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरीत रंगलेल्या कबड्डी महोत्सवाचा शेवट रोमहर्षक झाला. एकीकडे शिवशक्तीने राजमाता जिजाऊचे आव्हान ३२-३० असे मोडीत काढल्यानंतर पुरुषांच्या व्यावसायिक गटात थराराने परमोच्च िंबदू गाठला. पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या बीपीसीएलने १९-३३ अशा पिछाडीवर असताना शेवटच्या पाच मिनीटात डाव फिरवण्याची किमया साधली आणि सामना ३७-३७ असा बरोबरीत सोडवला. या बरोबरीनंतर बीपीसीएल सलग दुसर्यांदा आयएसपीएलकडून जेतेपद हिसकावणार असे वाटत होते, पण आयएसपीएलने शेवटच्या पाच मिनीटात केलेल्या चूकांची पुनरावृत्ती पाच-पाच चढायांच्या डावात टाळली आणि ९-४ अशा फरकाने बाजी मारत बीपीसीएलविरुद्धचा हिशेब चुकता केला.
आयएसपीएलचे चौथे जेतेपद
याआधी आयएसपीएलने राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या व्यावसायिक स्पर्धेत बाजी मारली होती. तसेच अमरावती येथील तिवसा येथे झालेल्या अखिल भारतीय व्यावसायिक गटाच्या आमदार चषक आणि मग वाशिमच्या आमदार चषकात अजिंक्यपद पटकावले होते. या हॅटट्रिक जेतेपदानंतर त्यांना ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळाच्या स्पर्धेत त्यांच्या यशाची मालिका बीपीसीएलने मोडीत काढली होती.

नीरज मिसाळ बाईकवर स्वार
अत्यंत संघर्षपूर्ण अंतिम सामन्यात आयएसपीएलसाठी झुंजार खेळ करणार्या नीरज मिसाळला त्याच्या वेगवान चढायांनी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवून दिला. त्याच्या या कर्तृत्वाबद्दल आमदार सुनील राऊत यांनी नीरजला लाखमोलाची बाईक भेट दिली. विजेता आयएसपीएल विजेत्याच्या चषकासह दोन लाख रुपयांचा मानकरी ठरला. उपविजेत्या बीपीसीएलला दीड लाखांचा पुरस्कार लाभला. उपांत्य पराभूत संघांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. बीपीसीएलचा मिलन दहिया सर्वोत्तम चढाईवीर ठरला तर सीजीएसटीच्या साईप्रसाद पाटीलने पकडपटूचा मान मिळवला. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजक आमदार सुनील राऊत यांच्यासह माजी आमदार रमेश कोरगावकर, महिला विभागप्रमुख रश्मी पहुडकर, नगरसेवक दीपक सावंत, विश्वास शिंदे, म्युनिसिपल कामगार सेनेचे बाबा कदम, मुंबई ंउपनगर संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर, कार्याध्यक्ष सुधाकर घाग, सचिव राजेश पडेलकर, उपाध्यक्ष सदानंद माजलकर, संयुक्त सचिव राजेंद्र अनभवणे , प्रसिद्ध कबड्डी निवेदक राणाप्रताप तिवारी यांच्या उपस्थितीत पार पडला.








