निखिल अहिरवाल च्या नाबाद शतकी खेळीने गावस्कर संघाला विजेतेपद
मुंबई : निखिल अहिरवालच्या (नाबाद १२३) नाबाद शतकी खेळीमुळे गावस्कर संघाने एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक १४ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक ९ गुणांची कामे करीत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या लढतीच्या शेवटच्या दिवशी प्रतिस्पर्धी शास्त्री संघाने आज कार्तिक छाजेर याच्या (११३) शतकी खेळीनंतर ८ बाद ३०२ धावांवर आपला डाव घोषित केला, आणि गावस्कर संघ या लक्ष्याचा पाठलाग करताना निम्मा संघ ९३ धावांत तंबूत परतला होता. त्यावेळी त्यांना पराभव समोर दिसत होता. मात्र निखिल अहिरवाल आणि रितेश शॉ (७९) या जोडीने जिद्दीने फलंदाजी करताना सहाव्या विकेटसाठी तब्बल १८८ धावांची दमदार भागीदारी करून पहिल्या डावातील महत्वपूर्ण आघाडी घेण्यात यश मिळविले. निखिल अहिरवाल याने १५० चेंडूंचा सामना करताना १६ चौकारांसह नाबाद १२३ धावांची खेळी करीत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात सीऊन्हाचा वाटा उचलला. या आघाडीमुळे गावस्कर संघाने ९ गुणांची कमाई करीत चषकावर आपले नाव कोरले. कर्नाटक सपोर्टींग येथील दुसऱ्या लढतीत वेंगसरकर संघाच्या २४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तेंडुलकर संघाचा कर्णधार आरव यादव (११८) याने देखील शतकी खेळीचा नजराणा पेश करताना ७८ षटकांतच ८ बाद २८९ धावा करून पहिल्या डावातील आघाडीचे ३ गुण वसूल केले. त्यांनी एकूण ६ गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला. तेंडुलकर संघासाठी नीयांश मारू (४०), मुसाब सय्यद (३४), आणि स्तवन मोरे (४७) यांनी देखील संघाच्या यशात हातभार लावला. वेंगसरकर संघाच्या अर्णव चव्हाण याने ९१ धावांत ४ बळी मिळविले.स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून तेंडुलकर संघाचा कर्णधार आरव यादव याला गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज अनुज चौधरी (३०६) धावा याला तर सर्वोत्तम गोलंदाज म्हणून शौनक गावडे (१० बळी) यांना गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, एच.डी.एफ. सी. बँकेच्या मनीषा गावडे आणि विनीत जाधव तसेच मुंबई क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव डॉ. उन्मेष खानविलकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.संक्षिप्त धावफलक – कर्नाटक सपोर्टींग – वेंगसरकर संघ – २४५ आणि ४ बाद ४९ वि. तेंडुलकर संघ – ७८ षटकांत ८ बाद २८९ डाव घोषित (नियांश मारू ४०, आरव यादव ११८, मुसाब सय्यद ३४, स्तवन मोरे ४७). ओव्हल मैदान- शास्त्री संघ – १०१ षटकांत ८ बाद ३०२ डाव घोषित (श्रेयस लाटे ३८, दक्ष बिष्णोई ३१, देवांग koli ५५, कार्तिक छाजेर ११३; ईशान विचारे ३३ धावांत 3 बळी, श्रेयांस सिंग ७७ धावांत ४ बळी ) वि. गावस्कर संघ – ६८.५ षटकांत ८ बाद ३०७ डाव घोषित (अद्वैत कचराज ४१, निखिल अहिरवाल नाबाद १२३, रितेश शॉ ७९; दाक्षित पाटील ४०धवांत २ बळी , अर्णव शेलार १२ धावांत २ बळी) ******* फोटो ओळी – एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक १४ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत विजेता ठरलेल्या गावस्कर संघाचे छायाचित्र. सोबत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, एच.डी.एफ. सी. बँकेच्या मनीषा गावडे आणि विनीत जाधव तसेच मुंबई क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव डॉ. उन्मेष खानविलकर आणि अकादमीचे प्रशिक्षक अमित जाधव दिसत आहेत.








