- शिक्षण समिती अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन
- ३५ चित्रकारांच्या ७० चित्रांचा समावेश
मुंबई : धुक्यात हरवलेली वाई… कृष्णा नदीचा काठ… महागणपतीच्या मंदिरावर पहुडलेलं सकाळचं कोवळं ऊन… पाचगणीच्या डोंगररांगामध्ये विसावलेली सायंकाळ… पुरातन मंदिरांभोवतीची निरव शांतता… आणि दूरदूरपर्यंत पसरलेलं मन मोहवून टाकणारं निसर्गचित्र…! या विविधरंगी अनुभवांसाठी निमित्त ठरले ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील कला अकादमीच्या आर्टिस्ट कॅम्पमधील निवडक चित्रांच्या प्रदर्शनाचे… !. हे प्रदर्शन दक्षिण मुंबईतील वरळीतल्या नेहरू सेंटरच्या आर्ट गॅलरीत महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे आयोजित करण्यात आले आहे.
पालिकेच्या शिक्षण विभागातील कला अकादमीतील कला शिक्षकांची चार दिवसीय निसर्गचित्रण कार्यशाळा डिसेंबर २०२५ मध्ये वाई (जि. सातारा) येथे पार पडली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिक्षकांनी वाई, पाचगणी, मेणवली, धोम धरण, नृसिंह मंदिर, तीर्थक्षेत्र संगम माहुली या ठिकाणचे निसर्गचित्र साकारले. या कार्यशाळेतील निवडक चित्रकृतींचे प्रदर्शन वरळीतील नेहरू सेंटर येथील आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती राजेश्री शिरवडकर यांच्या हस्ते काल पार पडले.
उपशिक्षणाधिकारी मुख्तार शहा, निसार खान, विनोद कदम, अधीक्षक लक्ष्मण गोसावी, कला अकादमीचे प्राचार्य दिनकर पवार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कला अकादमीचे निदेशक व शिक्षक आदी याप्रसंगी उपस्थित होते. ३५ चित्रकारांच्या ७० चित्रांचा समावेश असलेले हे प्रदर्शन १ एप्रिल ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.








