- ‘हिटमॅन’ रोहित शर्माशी पहिल्या भेटीवर आयुषने म्हात्रेने केली टिप्पणी
चेन्नई : टीम इंडिया अंडर-19 संघाला आपल्या कर्णधारपदी विश्वचषक जिंकवून देणारा युवा फलंदाज आयुष म्हात्रेने आपली आदर्श रोहित शर्मासोबतची भेट खास असल्याचे सांगितले आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आयुषने याला आपल्या आयुष्यातील स्वप्नवत दिवस म्हटले.गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यापूर्वी म्हात्रेने रोहितला मेसेज केला होता. त्यानंतर रोहितने स्वतः त्याला कॉल करून बातचीत केली आणि भेटण्यासाठी आपल्या घरी बोलावून जवळपास दोन तास फलंदाजी कौशल्यांवर चर्चा केली.
व्हिडिओ कॉल नाही, समोरासमोर भेटण्याची जिद्द
म्हात्रेने सांगितले की त्याने फक्त एक मेसेज केला होता, पण रोहित शर्माने स्वतः त्याला कॉल केला. रोहितने त्याला विचारले की त्याला काय म्हणायचे आहे. जेव्हा आयुषने त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा रोहितने विचारले की तो कुठे राहतो.आयुषने सांगितले की तो विरारमध्ये राहतो. यावर रोहितने विचारले, ‘तू विरारहून मला भेटायला येशील का?’ आयुषने उत्तर दिले की तो आपल्या आदर्शला भेटण्यासाठी कुठेही जाऊ शकतो.रोहितने व्हिडिओ कॉलचा पर्यायही दिला होता, पण आयुषला वैयक्तिकरित्या भेटायचे होते. दुसऱ्या दिवशी ते रोहितच्या घरी पोहोचले, जिथे दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली.आयुष म्हणाला, ‘दोन तास कसे गेले हे मला कळलेच नाही. त्यांच्याशी बोलून खूप आनंद झाला.’ म्हात्रेच्या मते, आदर्श व्यक्तीने त्याला इतका वेळ दिला, ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
रोहितच्या पुनरागमनाची जागा गमावल्याचे दुःख नाही
एका वेळी रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान रोहित शर्माचे मुंबई संघात पुनरागमन झाले होते, ज्यामुळे आयुषला आपली जागा गमवावी लागली होती. त्यावेळी त्याने रोहितबद्दल आदर व्यक्त करत एक भावनिक पोस्ट लिहिली होती. तो सुरुवातीपासूनच रोहितला आपला आदर्श मानत आला आहे.माझ्या आदर्श व्यक्तीसाठी त्यावेळी मुंबई संघातील जागा गमावण्याचे किंचितही दुःख मला नव्हते. उलट रोहितसाठी बेंचवर बसणे हा मला सन्मानच वाटला असे आयुषने सांगितले.
आयुषच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर-19 संघ ठरला विश्वविजेता
आयुष या वर्षी भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचा कर्णधार होता. मात्र, IPL 2026 ची सुरुवात त्याच्यासाठी चांगली नव्हती आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध तो खाते न उघडताच बाद झाला.दुसरीकडे, रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी हंगामाची दमदार सुरुवात केली आणि कोलकाताविरुद्ध 78 धावांची शानदार खेळी केली.








