मुंबई : लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आनंदराव अडसूळ ट्रस्ट ट्रॉफी आंतर सहकारी बँक सांघिक कॅरम स्पर्धेत अपना सहकारी बँकेने अजिंक्यपद पटकाविले. गीतेश कोरगावकर व प्रियेश पाठक यांच्या विजयी खेळामुळे अपना बँकेने म्युनिसिपल बँकेचा २-१ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम उपविजेत्या म्युनिसिपल बँकेला राहुल पडेलकरने एकमात्र विजय मिळवून दिला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, युनियनचे सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे, एलआयसी प्रतिनिधी दिपाली घुर्ये, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट, को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित सांघिक कॅरम स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाच्या सामन्यात एनकेजीएसबी बँकेने कोकण बँकेचा २-१ असा पराभव करतांना गणेश शानभाग व प्रथमेश पवार यांनी विजयी खेळ केला. स्पर्धेतील सर्वोत्तम कॅरमपटू अपना बँकेचा गीतेश कोरगावकर ठरला. म्युनिसिपल बँकेचा राहुल पडेलकर, एनकेजीएसबी बँकेचा प्रथमेश पवार, कोकण बँकेचा सोहेल मुकादम यांनी उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकाविला. पहिल्या चार विजेत्या-उपविजेत्या संघांना आकर्षक एलआयसी-अडसूळ ट्रस्ट ट्रॉफीसह पदक, स्ट्रायकर, टी शर्ट व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
एलआयसी-अडसूळ ट्रॉफी कॅरम स्पर्धेत अपना बँक अजिंक्य








