मुंबई : ३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये जोगेश्वरी पोलीस ठाण्यातील आरती सुरवसे यांनी वूशू तसेच बॉक्सिंग या दोन्ही क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. २२ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या वूशू स्पर्धेत ४५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर २४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेतही त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत पुन्हा एकदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या दुहेरी यशामुळे पोलीस दलासह जोगेश्वरी विभागाचा मान उंचावला आहे. पोलीस सेवेत कार्यरत असताना कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तसेच क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. आरती सुरवसे यांच्या या यशाबद्दल वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत असून, आगामी स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या आरती सुरवसे यांना दुहेरी सुवर्णयश








