मुंबई : रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे ४ थे एक दिवसीय पंच शिबीर एल. जे. ट्रेनिंग सेंटर ( वातानुकूलित ), दादर, मुंबई येथे संपन्न झाले. या शिबिरात एकंदर ४१ आंतर राष्ट्रीय, राष्ट्रीय व स्थानिक स्तरावरील पंचानी आपला सहभाग घेतला होता. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव यांनी शिबिराची सुरवात करताना पहिल्या सत्रात राज्य संघटना सातत्याने आयोजित करत असलेल्या या उपक्रमाचे महत्व समजावून सांगितले. कोल्हापूरहून आलेले राष्ट्रीय पंच सूर्यकांत पाटील यांनी आपले अनुभव सांगत व बोर्ड पंच म्हणून काम करणाऱ्यांकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. सत्राच्या उत्तरार्धात व दुसऱ्या सत्रात आंतर राष्ट्रीय पंच अजित सावंत यांनी शिबिरात प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येणार असल्याचे सांगून पंचांना येणाऱ्या समस्या व्यक्तिशः जाणून घेत खेळाडूंच्या तक्रारींचे निवारण करण्यावर लक्ष केंद्रित केले व मार्गदर्शन केले. तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात आंतर राष्ट्रीय पंच केतन चिखले यांनी कॅरम बोर्डावर प्रात्यक्षिके दाखवत प्रत्येक पंचाची बोर्डावर परीक्षा घेतली व त्यांच्या समस्यांचे समाधान केले. तर आंतर राष्ट्रीय पंच आशिष बागकर यांनी नियमांची सविस्तर माहिती देत स्पर्धेचा ड्रॉ कसा काढावा याबाबत मार्गदर्शन केले. आंतर राष्ट्रीय पंचांच्या या मार्गदर्शनामुळे पंचांच्या ज्ञानात भर पडल्याचे उपस्थित पंचानी बोलून दाखवले. रोझिना गोदाद, नॅन्सी सिक्वेरा, प्राजक्ता नारायणकर, शोभा कामत, शुभल पडते, स्नेहा मांजरेकर, आरती आचरेकर या महिला पंचा व्यतिरिक्त गौतम जाधव, महेश बोडस, रोहित कदम, अजित चव्हाण, दीपक साळसकर, अरविंद नारकर, हेमंत पांचाळ, शैलेश वाघाटे, देविदास सिनळकर, श्रीकांत ढवळे, विजय दळी, शामसुंदर परब, संदीप अडागळे,मंदार कासारे यांनी शिबिरात सक्रिय सहभाग घेतला. या स्तुत्य उपक्रमाबद्धल राज्य स्तरीय पंच प्रसाद देवरुखकर यांनी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे विशेष आभार मानले. सर्व पंचानी य उपक्रमात सक्रिय सहभाग घेत विविध प्रश्नाचा भडीमार केल्याने शिबीर यशस्वी झाल्याचे समाधान असोसिएशनला मिळाले. विरंगुळा म्हणून घराघरात खेळला जाणाऱ्या कॅरमचे रूप बदलून व खेळात व्यावसायिकता आणण्याचा असोसिएशनचा प्रयत्न असल्याचे मानद सचिव अरुण केदार यांनी सांगितले. यासाठी यावर्षी राज्यातील राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय व नामवंत खेळाडूंसाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज असून त्यांच्यासाठीही अशा शिबिराचे आयोजन करण्याची ईच्छा व्यक्त केली. शिवाय सर्वसाधारण खेळाडू व कॅरम रसिकांपर्यंत खेळांच्या नियमांची माहिती पोहोचव्यासाठी त्यांच्यासाठीही लवकरच अशा उपक्रमाचे आयोजन करण्याचे जाहिर केले.
राज्य कॅरम संघटनेचे ४ थे पंच शिबीर संपन्न








