मुंबई : क्रिकेटचा कुठलाही सामना खेळत असताना फलंदाजीत शतकी खेळी कशी करता येईल आणि गोलंदाजीत ५ बळी कसे मिळविता येतील ते शिकून घ्या असे मुंबईच्या १९ वर्षाखालील निवड समितीचे चेअरमन मंदार फडके यांनी म्हटले आहे. चेंबूर, माहुल येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या ए . वाय. एम. सिंटेक्स चषक १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. आम्ही निवड समिती म्हणून काम करताना कोणता खेळाडू फलंदाजीत सातत्य राखताना मोठ्या शतकी खेळी करतो किंवा कोणते गोलंदाज ५ किंवा अधिक बळी मिळवत आहेत हेच पाहतो असेही ते पुढे म्हणाले.
भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी देखील तोच मुद्दा पुढे नेताना खेळाडूंकडे नुसते क्रिकेट कौशल्य असून उपयोग नाही तर त्याच्या जोडीला कठोर मेहनत करण्याची तयारी, शिस्त आणि खेळातील समर्पणाची भावना असेल तरच तो खेळाडू यशोशिखरापर्यंत पोहोचू शकतो असे सांगितले.
तत्पूर्वी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रिकेट मंत्रास संघाने सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकादमी संघावर ३ विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. प्रथम फलंदाजी करणारा सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट संघ ४० षटकांच्या सामन्यात २२.४ षटकांतच केवळ ८७ धावांत गारद झाला. स्वर भोसले याने ३५ धावांत ५ बळी तर शौर्य नवले याने २६ धावांत ४ बळी मिळवत ही करामत केली. हर्ष मेनन (१२), धीर छाजेर (११) आणि अर्णव कोरे (नाबाद १५) यांनाच दोन आकडी धावा करता आल्या. या छोट्याशा आव्हानाचा पाठलाग करताना क्रिकेट मंत्रास संघाला नील भट्ट (१३) आणि धार्मिक प्रभू (२६) यांनी ४४ धावांची सलामी दिली; पण नंतर त्यांची देखील ५ बाद ५३ अशी अवस्था झाली होती. मात्र शौर्य नवले याने नाबाद १२ धावा करून आपल्या संघाचा विजय निश्चित केला. सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकादमीच्या तनिश साळी (२० धावांत ४ बळी) आणि आर्यन मंदोरा (१९ धावांत ३ बळी) यांनी टिच्चून गोलंदाजी केली, मात्र संघाला विजयी करण्यात त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून स्वर भोसले याची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून एम.सी.सी. , सांताक्रूझ संघाच्या निसर्ग चौधरी, सर्वोत्तम फलंदाज म्हणून कुशल सातार्डेकर – १९५ धावा (वेंगसरकर क्रिकेट अकादमी , माहुल), सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आर्यन मंदोरा (सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकादमी ) आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून नील भट्ट (क्रिकेट मंत्रास ) यांना गौरविण्यात आले. मुंबईच्या १९ वर्षाखालील निवड समितीचे चेअरमन मंदार फडके आणि भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक – सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकादमी – २२.४ षटकांत सर्वबाद ८७ ( हर्ष मेनन १२, धीर छाजेर ११, अर्णव कोरे नाबाद १५; स्वर भोसले ३५ धावांत ५ बळी, शौर्य नवले २६ धावांत ४ बळी ) पराभूत वि. क्रिकेट मंत्रास – २२.४ षटकांत ७ बाद ८८ (धार्मिक प्रभू २६, नील भट्ट १३, अर्णव पारेख १२, शौर्य नवले नाबाद १२ ; तनिश साळी २० धावांत ४ बळी, आर्यन मंदोरा १९ धावांत ३ बळी) – सामनावीर – स्वर भोसले











