सोनगाव : पाथरे बुद्रुक (ता. राहाता, जि. अहिल्यानगर) येथे अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सोमवारी (दि. ३० मार्च) रात्री भीषण घटना घडली. जोरदार वाऱ्यामुळे विजेची तार तुटून थेट गायींच्या गोठ्यावर कोसळल्याने तब्बल ९ गायींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.संजय भास्कर घोलप व सोपान लक्ष्मण घोलप यांच्या गोठ्यात ही दुर्घटना घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.या दुर्घटनेत शेतकरी संजय घोलप यांचे अंदाजे ८ ते ९ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा हा गंभीर फटका असल्याचे स्थानिकांनी सांगितले.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वीज वितरण विभाग व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
वादळी वाऱ्याचा तडाखा : विजेची तार तुटून ९ गायींचा मृत्यू








