भर पावसात सोनईतील सहकार पॅनलच्या प्रचार सभेला हजारोंची उपस्थिती
सोनई : मुळा सहकारी साखर कारखाना, सोनईच्या निवडणुकीत सभासद शेतकऱ्यांनी सहकार पॅनलच्या विजयाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली असून उर्वरित जागांवरील उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा निर्धार केला आहे, असे प्रतिपादन माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी केले.
मुळा सहकारी साखर कारखान्याच्या १८ संचालकांची बिनविरोध निवड झाल्यानंतर करजगाव गट व महिला मतदारसंघाच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २४) सोनई येथे सहकार पॅनलची प्रचार सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार यशवंतराव गडाख होते, तर प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री शंकरराव गडाख होते.
यावेळी बोलताना शंकरराव गडाख म्हणाले की, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस वेळेत गाळप व्हावा यासाठी कारखान्याची गाळप क्षमता ९ हजार टनांपर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना उसाचा चांगला दर देता यावा यासाठी इथेनॉल प्रकल्प उभारण्यात आला. कार्यक्षेत्रात कितीही ऊस उपलब्ध झाला तरी कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस १२ महिन्यांपेक्षा अधिक काळ गाळपाविना राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.कारखान्याबाबत काहीजण राजकीय स्वार्थातून खोटे आरोप करत असून त्यांना सभासद मतदानातून उत्तर देतील, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात यशवंतराव गडाख यांनी मुळा कारखान्याच्या स्थापनेचा इतिहास उलगडला. पन्नास वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने कारखान्याची उभारणी करण्यात आली.
सभेला मुळाचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडूबाळ कर्डीले, ह.भ.प. रामनाथ महाराज पवार, शिरेगाव सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रमेश जाधव, माजी सरपंच रत्नाकर बोर्डे, अश्रूबा सानप यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, बिनविरोध निवडून आलेले संचालक, ज्येष्ठ सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भर पावसातही हजारो सभासद आणि शेतकऱ्यांनी सभेला उपस्थित राहून सहकार पॅनलला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला.
विरोधी उमेदवारांच्या कुटुंबीयांचाही सहकार पॅनलला पाठिंबा– शिरेगाव सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रमेश जाधव यांनी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दर्शविला. शिरेगाव परिसरातून सहकार पॅनलला मोठे मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







