- ‘श्री साई शकुंतला वैष्णवी प्रोडक्शन’चा लावणी कार्यक्रम; सौ. सुजाता भाटे यांची संकल्पना, कुस्त्यांच्या आखाड्याने वाढणार रंगत
सोनगाव :राहुरी तालुक्यातील धानोरे येथील ग्रामदैवत धनेश्वर देवस्थानचा देवभार यात्रोत्सव यंदा पारंपरिक थाटात सोमवार (दि. १३ एप्रिल) व मंगळवार (दि. १४ एप्रिल) या दोन दिवसांत साजरा होणार आहे. श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचा संगम साधणाऱ्या या यात्रेकडे पंचक्रोशीतील भाविकांचे लक्ष लागले असून, गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी सकाळी धनेश्वर देवतेचा दुग्धाभिषेक व पूजाविधी होणार आहे. सायंकाळी काठीच्या सनईच्या सुरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, पारंपरिक वाद्यांच्या गजरात वातावरण भक्तिमय होईल. मिरवणुकीनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.
रात्री ‘श्री साई शकुंतला वैष्णवी प्रोडक्शन’ निर्मित व निर्माती सौ. सुजाता भाटे यांच्या संकल्पनेतून ‘पाहुणं यायलाच लागतंय’ हा लावणी कार्यक्रम सादर होणार असून, हा कार्यक्रम यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
मंगळवारी दुपारी कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील नामांकित मल्लांच्या झुंजी पाहण्याची संधी मिळणार आहे. पारंपरिक कुस्ती फडामुळे यात्रेची रंगत अधिक वाढणार आहे.
यात्रेदरम्यान धनेश्वर देवस्थान व घाट परिसरात विविध दुकाने, राहाटपाळणे तसेच करमणुकीची साधने उभारण्यात येणार असून, ग्रामस्थ व भाविकांसाठी हा उत्सव आकर्षण ठरणार आहे. यात्रेनिमित्त सामाजिक सलोखा व सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडणार आहे.
या यात्रोत्सवाचे आयोजन धनेश्वर देवस्थान ट्रस्ट, सर्व युवक तरुण मंडळ आणि समस्त ग्रामस्थ धानोरे यांच्या वतीने करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे







