श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव, उंदिरगाव परिसरातील १० ते १५ गायी काल रात्रीतून चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गोपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील हरेगाव, उंदिरगाव परिसरात गोपाल करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घराबाहेर गोठयांत बांधलेल्या गायींचे दावे तोडून या गायी चोरून नेण्यात आल्या. साधारणपणे रात्री १२ ते पहाटे ४ या दरम्यान या गायींची चोरी करण्यात आली आहे. हरेगाव येथील डॉ. संजय नवथर, ज्ञानदेव फुलवर, वसंत गायकवाड, उंदिरगावचे ॲड. वाघ, हरेगावचे व्हेटर्नरी डॉ. नंदू वाघमारे आदींच्या गायी चोरून नेण्यात आल्या आहेत. या गायी उंदिरगाव, हरेगाव, खैरीरोड, नवरस्ता आदी ठिकाणाहून चोरून नेण्यात आल्या आहेत. आज पहाटे शेतकरी जेव्हा दूध काढण्यासाठी आपल्या गोठयात किंवा घरासमोर बांधलेल्या गायीजवळ गेले असता बांधलेल्या ठिकाणी गायी दिसून आल्या नाही. गायींचे दावे तोडलेले आढळून आले. त्यामुळे कोणीतरी मोठ्या चारचाकी वाहनातून या गायी चोरून नेल्याचा संशय आहे.
याबाबत डॉ. संजय नवथर आणि इतर गोपालक हे दुपारी श्रीरामपूर शहर पोलिसात तक्रार देण्यासाठी आले होते. सदर गायींच्या चोरीमुळे हरेगाव, उंदिरगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट आणि भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सदर लावावा, अशी मागणी गोपालकांनी केली आहे.
हरेगाव, उंदिरगाव परिसरात रात्रीतून १०-१५ गायांच्या चोरी








