शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

‘चिमुकलीचा जीव वाचविला नाही तर जग माफ करणार नाही’- डॉ. सुधा कांकरिया

---Advertisement---

लिंगगुणोत्तर कमी असलेल्या १६ गावांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न

अहिल्यानगर – चिमुकलीचा जीव वाचविला नाही तर जग माफ करणार नाही. मुलगी ही सृष्टीचा आधार आहे. मुलीला नकार देणे म्हणजे उद्याच्या आईलाच नकार देणे होय, असे प्रतिपादन ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या आद्यप्रवर्तक तथा पीसीपीएनडीटी समितीच्या सदस्या डॉ. सुधा कांकरिया यांनी केले.जिल्ह्यात मुला-मुलींचे लिंगगुणोत्तर समान ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जनमानसात मुलगा-मुलगी समानतेबाबत व्यापक स्वरूपात जागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर तालुक्यात लिंगगुणोत्तर कमी असलेल्या १६ गावांमध्ये ग्रामसमिती सक्षम करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, श्रीरामपूर येथे ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस श्रीमती कांकरिया यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका दक्षता समिती अध्यक्ष तथा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे आदी उपस्थित होते.डॉ. कांकरिया म्हणाल्या, स्त्रीभ्रूणहत्या हा ‘मुका दुष्काळ’ आहे. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी ११-सूत्री कृती कार्यक्रम सादर केला. येत्या १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामसभेत स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घ्यावा, तसेच लोकसहभागातून ‘१० रुपयांची जादू – लखोपती योजना’ राबवावी.गर्भवती मातांशी आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मैत्रीपूर्ण संवाद साधून गर्भरक्षण व गर्भसंस्कार यावर मार्गदर्शन करावे. तसेच सोनोग्राफीचा गैरवापर होऊ नये, याची दक्षता घ्यावी. विवाह सोहळ्यात ‘आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा’ हा उपक्रम राबवून लोकचळवळ उभी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.तहसीलदार श्री. वाघ म्हणाले, प्रत्येकाच्या मनात स्त्री जन्माच्या स्वागताची पणती प्रज्वलित झाली आहे. यामुळे स्त्रीभ्रूणहत्येचा अंधकार दूर होईल. तसेच बालविवाह रोखण्यासाठीही सर्वांनी दक्षता घ्यावी.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी आरोग्य विभागाची टीम या दिशेने सक्रियपणे काम करत असल्याचे सांगत भविष्यात या गावांतील लिंगगुणोत्तर सुधारेल, असा विश्वास व्यक्त केला.या कार्यशाळेत फत्याबाद येथील सरपंच ज्ञानेश्वरी आठरे यांच्यासह उपस्थितांनी मनोगत व्यक्त करत ११-सूत्री कार्यक्रम गावागावात राबविण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले, तर आभार डॉ. मोहन शिंदे यांनी मानले. शेवटी उपस्थितांना स्त्री जन्माच्या स्वागताची शपथ देण्यात आली.या कार्यशाळेत नरसाळी, बेलापूर खुर्द, एकलहरे, वांगी बुद्रुक, मांडवे, हरेगाव, माहवाडगाव, काडीत खुर्द, माळेवाडी, गुजरवाडी, गळनिंब, फत्याबाद, काडीत बु., कन्हेगाव, मातापूर व पाचवाडी येथील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment