मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार प्रभारी गृहनिर्माणमंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळ अधिवेशन कामकाजादरम्यान लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्न/लक्षवेधी प्रश्नांवर मुंबईत मॅरेथॉन बैठका घेऊन सविस्तर आढावा घेतला.बैठकीतील सर्व मुद्द्यांचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात येणार असून, त्यावरील निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. संबंधित कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण होतील, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.या बैठकीत गृहनिर्माण व गृह विभागाचे राज्यमंत्री श्री.पंकज भोयर, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, प्रकाश सुर्वे, अनिल परब, अतुल भातखळकर, भाई जगताप, श्रीकांत भारतीय, सुनील शिंदे आणि सना मलिक उपस्थित होते.सदर आमदारांनी मांडलेल्या प्रश्नांबाबत त्यांना आश्वस्त करताना देसाई यांनी संबंधित विषय उपमुख्यमंत्री महोदयांसमोर सकारात्मकपणे मांडून योग्य निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.बैठकीत मुंबई व उपनगरातील म्हाडा इमारतींच्या थकीत सेवाशुल्कासंदर्भातील प्रश्न, क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासाबाबत धोरणात्मक निर्णय, प्रलंबित गृहनिर्माण विषय, तसेच अनुशक्तीनगरसह विविध भागांतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंबंधी मुद्द्यांवर चर्चा झाली. जलवाहिन्या, पाणीटाक्या आणि संबंधित यंत्रणांमधील अडचणी दूर करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांबाबत निर्देश देण्यात आले.प्रभारी मंत्री म्हणून सोपविण्यात आलेल्या अतिरिक्त जबाबदारीच्या अनुषंगाने या सर्व विषयांवर समन्वय साधून आवश्यक अहवाल उपमुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार असून, संबंधित प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रभावी पाठपुरावा केला जाईल, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी नमूद केले.
मुंबईकरांच्या प्रश्नांवर राज्य सरकार सकारात्मक – मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुंबईत मॅरेथॉन बैठका







