नेवासा : नेवासा येथे कला आणि अध्यात्माचा सुंदर संगम पाहायला मिळत असून, श्री संत ज्ञानेश्वर आर्ट गॅलरीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून समाजप्रबोधनाचे कार्य सुरू आहे. सन २०१८ मध्ये ज्येष्ठ चित्रकार भरतकुमार उदावंत (वय ६५) आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित उदावंत (वय २६) यांनी या आर्ट गॅलरीची स्थापना केली. या गॅलरीच्या माध्यमातून विविध चित्रकला, शिल्पकला आणि बोलक्या भिंतींच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर जनजागृती केली जात आहे.
१५ मे रोजी या गॅलरीत श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा विषय ठरणारे एक भव्य तैलचित्र साकारण्यात आले. लोखंडी पत्र्यावर तयार करण्यात आलेले हे चित्र ३ फूट बाय ५ फूट आकाराचे असून ऑईल पेंट अर्थात तैलरंग माध्यमाचा वापर करून ते साकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रात श्री स्वामी समर्थ यांच्या पाठीमागे साक्षात भगवान श्री दत्तगुरु प्रकट होत असल्याचे जिवंत आणि आकर्षक दृश्य रेखाटण्यात आले आहे. कला आणि अध्यात्म यांचा अनोखा मिलाफ या चित्रातून अनुभवायला मिळत आहे.
हे वैशिष्ट्यपूर्ण चित्र पूर्ण करण्यासाठी सुमारे चार ते पाच दिवसांचा कालावधी लागला. पत्र्यासारख्या कठीण माध्यमावर इतक्या बारकाईने आणि जिवंतपणे चित्र साकारणे हे मोठे आव्हान मानले जाते. मात्र अनुभव आणि कलात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर हे चित्र अत्यंत प्रभावी स्वरूपात पूर्ण करण्यात आले आहे.
याबाबत भावना व्यक्त करताना चित्रकार सत्यजित उदावंत म्हणाले, “कोणतीही मोठी कलाकृती साकारताना अनुभवाची जोड आवश्यक असते. हे चित्र तयार करताना मला माझे वडील आणि क्षेत्रातील बेस्ट चित्रकार भरतकुमार उदावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अनुभवामुळेच पत्र्यासारख्या कठीण माध्यमावर हे तैलचित्र इतके सुंदर रीतीने उमटू शकले.”
पिता-पुत्रांच्या कलेतून उमटले अध्यात्म; श्री स्वामी समर्थांचे तैलचित्र चर्चेत







