कोपरगाव : अहिल्यानगर जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखली जाणारी सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल यंदाही दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे.मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत शाळेतील सर्व १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून,त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावर्षीच्या निकालात १५८ पैकी तब्बल १२१ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवत ‘डिस्टिंक्शन’ प्राप्त केले. तसेच ३१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर ६ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश मिळवले.विशेष म्हणजे यंदा एकाही विद्यार्थ्याला अपयश आले नाही.शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मिस. अनुष्का बाळासाहेब चांदोरे हिने ९७.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. श्रेयस मारुती खैरे याने ९७.०० टक्के गुणांसह द्वितीय, तर वैभव तुकाराम पानगव्हाणे याने ९५.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
निकालाच्या गुणवर्गवारीनुसार ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण ४० विद्यार्थ्यांनी मिळवले असून,८० ते ८९.९९ टक्के गुण ५८ विद्यार्थ्यांनी प्राप्त केले.तसेच ७० ते ७९.९९ टक्के गुण ३६ विद्यार्थ्यांना, ६० ते ६९.९९ टक्के गुण १८ विद्यार्थ्यांना मिळाले.या यशामागे विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, अभ्यासकेंद्रित वातावरण,आधुनिक तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर तसेच पालकांचा भक्कम पाठिंबा महत्त्वाचा ठरल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. विद्यार्थ्यांसाठी नियमित टेस्ट सिरीज, रेमेडियल क्लासेस,वैयक्तिक मार्गदर्शन आणि मानसिक आरोग्य प्रशिक्षण यांचाही मोठा फायदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्याध्यापक श्री. के. एल. वाकचौरे यांनी सांगितले की, “आमची शाळा केवळ निकालासाठी नव्हे,तर उत्तम विद्यार्थी घडवण्यासाठी कार्यरत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे तर प्रेरणाही देतात आणि त्याचेच हे यशस्वी फलित आहे.”
दरम्यान,यशस्वी विद्यार्थ्यांनी विविध शाखांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असून,त्यांच्या भावी शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शाळेकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सोमैया ट्रस्टचे चेअरमन समीर सोमैया,गोदावरी बायो रिफायनरीचे सुहास गोडगे तसेच शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे आणि शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले.
श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीच्या निकालात झेंडा;अनुष्का चांदोरे शाळेत प्रथम..







