नेवासा : शहरातील, पंतजली पार्क परिसरातील श्री संत शिरोमणी सेना महाराज मंदिर संस्थान,येथे सुरू असलेल्या चार दिवसीय धार्मिक उत्सवाला शनिवारी, दि. ११ एप्रिल रोजी भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात प्रारंभ . सकाळी ध्वजपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या भव्य मुर्ती मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. टाळ-मृदुंग, हरिनाम गजर आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.मिरवणुकीत श्री संत सेना महाराज, श्री विठ्ठल-रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मुर्तींची शोभायात्रा काढण्यात आली. मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. या दरम्यान सूर्यमुखी हनुमान मंदिर, मळगंगा देवी मंदिर, खोलेश्वर गणपती मंदिर. मोहिनीराज मंदिर येथे स्वागत करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर मंदिर येथे मिरवणुकीचे विशेष स्वागत करण्यात आले. यावेळी संत भेटीचा भावपूर्ण सोहळा पार पडला.या प्रसंगी गुरुवर्य ह.भ.प. नंदकिशोर महाराज खरात, महंत रमेशनंदगिरीजी महाराज, महंत ऋषीनाथजी महाराज, महंत योगी दिपकनाथजी महाराज तसेच विणेकरी कैलास महाराज गायकवाड यांची उपस्थिती लाभली. गुरुवर्य ह.भ.प. नंदकिशोर महाराज खरात यांच्या वतीने भाविकांसाठी सरबत वाटपाची व्यवस्था करण्यात आली. यामुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना दिलासा मिळाला.या संपूर्ण सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक आणि आयोजक ह.भ.प. सचिन महाराज पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडला. नेवासा शहरासह तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या वारकरी, संत, महंत आणि भाविकांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. दि. १४ एप्रिलपर्यंत हा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन आणि पूजाविधींसह सुरू राहणार असून, आयोजकांनी भाविकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
संत शिरोमणी सेना महाराज मंदिर उत्सव भक्तिमय वातावरणात प्रारंभ, भव्य मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग







