श्रीरामपूर : संत ज्ञानेश्वर बी.एड. कॉलेज, भानसहिवरे येथील विद्यार्थ्यांनी बी.एड. अभ्यासक्रमांतर्गत श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील श्रीमती जानकीबाई आदिक विद्यालयात “आरोग्य विषयक मार्गदर्शन व आरोग्य तपासणी” हा उपक्रम उत्साहात राबविला.
या उपक्रमादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र, निपाणी वडगाव येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिमा गोर्डे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य व शिक्षण यांचा समतोल कसा राखावा, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील आरोग्यदायी सवयींचे महत्त्व पटवून दिले. तसेच उपस्थित पालकांनाही विद्यार्थ्यांच्या आरोग्य व दिनक्रमात सुधारणा कशी करता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांची विविध आरोग्य तपासणीही करण्यात आली. डॉ. गोर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही तपासणी करून आरोग्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.
कार्यक्रमाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सिंधू आदिक यांनी संत ज्ञानेश्वर बी.एड. कॉलेज व छात्रअध्यापकांचे मनापासून कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल थोरात यांनी केले, सूत्रसंचालन गणेश सोलट यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमेश्वर कोतकर यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटप्रमुख प्रशांत धंदक, प्रसाद मुंडलिक, आतिश ठोकळ, योगेश बोठे, अलिशा सुतार, वैशाली ठोंबरे, तृप्ती म्हस्के, सुजाता घाडगे, पूजा आढाव, ऐश्वर्या सोनवणे, फिजा पटेल, पूजा खेडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
बेल्हेकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील बेल्हेकर व डॉ. सौ. रंजनाताई बेल्हेकर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. तसेच या उपक्रमासाठी प्राचार्या श्रीमती स्वाती गव्हाणे, प्रा. मनिषा भोईटे व प्रा. शेखर जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होत असून समाजाशी नाते अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.







