भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी घेतला खरपूस समाचार
कॉक्रोच जनता पार्टीच्या स्थापनेवर भाष्य करण्यापेक्षा संजय राऊत यांनी मूर्ख आणि मंद जनता पार्टी स्थापन करून त्याचे स्वयंघोषित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व्हावे आणि त्याचे चिन्ह गाढव ठेवावे. त्याला अधिक प्रतिसाद मिळेल आणि तीच तुमची पात्रता आहे, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांचा गुरुवारी समाचार घेतला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.श्री. बन पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करण्याचे, तरुणाईची माथी भडकवण्याचे काम संजय राऊत करताहेत. त्यामुळे त्यांनी मूर्ख आणि मंद जनता पार्टी स्थापन करावी. त्याला जास्त अनुयायी मिळतील. संजय राऊत भविष्यात त्या पक्षाचे सर्वेसर्वा होतील. या देशाशी सर्वात जास्त गद्दारी कोणी केली असेल तर काँग्रेसने केली. चीनसोबत हातमिळवणी करून गद्दारी करण्याचे काम काँग्रेसने असंख्य वेळा केले. परदेशात जाऊन देशाची बदनामी करण्याचे काम राहुल गांधींनी केले. ज्यांचा पक्षच विदेशाच्या इशाऱ्यावर चालतो, विदेशातल्या निधीवर चालतो त्यांनी या देशांमध्ये गद्दार कोण आहे हे सांगण्याच्या भानगडीत पडू नये. परंतु संजय राऊत, एक लक्षात घ्या राहुल गांधींच्या वक्तव्याचे तुम्ही समर्थन करणार असाल तर येत्या काळात तुमच्या पक्षाची यापेक्षा अधिक वाताहात झाल्याशिवाय राहणार नाही, असे श्री. बन यांनी सुनावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे रिपोर्ट कार्ड हे जनता तपासत असल्यानेच जनतेने त्यांना निवडून दिले. संजय राऊत, तुमचा रिपोर्ट कार्ड कोण तपासणार? तुमचे रिपोर्ट कार्ड जनतेला दाखवले तर जनता तुम्हाला कधीही निवडून देणार नाही. तुम्हाला मुंबई महापालिकेमध्ये एखाद्या वॉर्डामध्येही निवडून येता येणार नाही. तुमचे रिपोर्ट कार्ड हे अपयशाचे, घोटाळ्याचे आणि महिलांना धमक्या देण्याचे कार्ड आहे. उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या उपस्थितीचे रिपोर्ट कार्ड पहिले तर 31 टक्के उपस्थिती आहे. संजय राऊत, तुमच्या खासदारकीच्या निधीचे रिपोर्ट कार्ड पहिले तर तुमच्या खासदार निधीतून आजपर्यंत जनतेच्या हिताचे एकतरी काम केलेले दाखवा, अशा शब्दात श्री. बन यांनी आव्हान दिले.







