नेवासा : नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथील रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल (CBSE पॅटर्न) या शाळेने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील सीबीएसई दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या निकालामुळे शाळेच्या यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या परीक्षेत आर्या मुकुंद हारदे हिने ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ प्रतिक्षा अनिल निपुंगे (८९%), पार्थ प्रशांत मापारी (८१%), राजवीर गणेश परदेशी (७८%) आणि अर्पिता नरेंद्र आढाव (७७%) यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा गौरव वाढविला. तसेच विविध विषयांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आपली गुणवत्ता सिद्ध केली.
विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास या त्रिसूत्रीमुळेच हे यश शक्य झाल्याचे शाळा प्रशासनाने नमूद केले. गुणवत्ता, शिस्त आणि सातत्य या मूल्यांवर आधारित शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
या यशानिमित्त शाळेत छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील अंबाडे, प्राचार्य पिटर बारगळ, संचालक अजित अंबाडे व निकिता अंबाडे, प्रि-प्रायमरी इंचार्ज मनीषा सिन्नरकर, देविदास कुटे तसेच शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. डॉ. मुकुंद हारदे यांनी संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल पटारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनीषा सिन्नरकर यांनी केले.
रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलने गुणवत्तेची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली मेहनत पुन्हा एकदा सिद्ध केली असून, या यशामुळे विद्यार्थ्यांना नव्या उंची गाठण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सीबीएसई दहावी निकालात रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के यशाचा विक्रम







