अखंड हरिनाम सप्ताहाने पंचक्रोशी भारावली; अध्यात्मासह ग्रामस्वच्छता, पर्यावरण व सामाजिक ऐक्याचा जागर
सोनगाव : संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथे पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात आणि अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. समस्त ग्रामस्थांच्या एकजुटीतून पार पडलेल्या या सप्ताहाने केवळ अध्यात्मिक नव्हे, तर सामाजिक प्रबोधनाचीही प्रभावी छाप पंचक्रोशीवर उमटवली. हरिनामाच्या अखंड गजराने गाव दुमदुमून गेले असून, ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देणारा हा सप्ताह ग्रामसंस्कृतीचा आदर्श सोहळा ठरला.
पहाटेच्या काकडा भजनाने दिवसाची सुरुवात होत होती, तर रात्री उशिरापर्यंत हरिकीर्तनांच्या माध्यमातून भक्तिरसाची अखंड धार वाहत होती. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, जाहीर कीर्तन, प्रवचने आणि वारकरी संप्रदायाच्या विविध धार्मिक परंपरांनी चणेगावचे वातावरण भक्तिमय झाले होते. गावातील प्रत्येक घर सजले होते. दारोदारी सडा, आकर्षक रांगोळ्या आणि पुष्पवृष्टीतून संत-महंतांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
सप्ताहाचा शुभारंभ उंबरेश्वर देवस्थानचे मठाधिपती ह.भ.प. दत्तगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते झाला. जनार्दन स्वामी संस्थानचे रमेशगिरीजी महाराज यांच्या प्रभावी प्रवचनाने भाविकांना अध्यात्मिक प्रेरणा मिळाली. सप्ताहादरम्यान ग्रामस्वच्छता अभियान, पर्यावरण संरक्षण उपक्रम, कृषी जनजागृती मोहीम आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अध्यात्म आणि समाजप्रबोधन यांची सुंदर सांगड या सप्ताहातून अनुभवायला मिळाली.
दररोज सायंकाळी होणाऱ्या हरिपाठात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला. वारकरी परंपरेतील संस्कार, सामूहिक भक्ती आणि गावकुसातील एकोप्याचे दर्शन या सप्ताहात घडले.
सप्ताहात ह.भ.प. ऋषिकेश महाराज कुयटे, भाऊसाहेब महाराज पन्हाळकर, चैतन्य महाराज राऊत, तुकाराम महाराज शास्त्री मुंडे, कृष्णाजी महाराज कमानकर, गोविंद महाराज गोरे आणि तुकाराम महाराज लाड यांच्या जाहीर हरिकीर्तनांनी वातावरण भारावून गेले. मृदंगाचार्य सचिन महाराज, गायनाचार्य मच्छिंद्र महाराज, रवी महाराज तसेच आळंदी वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांना भाविकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
सप्ताहाची सांगता सरला बेटाचे पीठाधीश्वर गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यानंतर हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शोभायात्रेतील आकर्षक रथ, संबळ वाद्यांचा निनाद, महिला लेझीम पथक, वाजंत्री पथक आणि वारकरी दिंडी हे विशेष आकर्षण ठरले.
चणेगावसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी या सप्ताहात सहभागी होत भक्ती, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा अद्वितीय संगम अनुभवला. गावाच्या एकजुटीचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा हा सप्ताह परिसरासाठी प्रेरणादायी ठरला.







