नांदेड : ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, वाडी बु. नांदेड येथील इयत्ता १० वीचा विद्यार्थी शशांक दक्षायनी एकनाथ बिडवे याने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आयोजित युविका 2026 या विशेष शैक्षणिक उपक्रमासाठी निवड होऊन शाळेच्या नावाला नवा गौरव मिळवून दिला आहे.शशांक बिडवे याची तामिळनाडू येथील महेंद्रगिरी इस्रो केंद्र येथे आयोजित प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून निवडक विद्यार्थ्यांना ही संधी देण्यात आली असून, त्यामध्ये शशांकने आपले स्थान निश्चित केले आहे.या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान, उपग्रह तंत्रज्ञान, रॉकेट प्रक्षेपण याबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात येईल. तसेच इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद साधण्याची आणि विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळाली.शशांकच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, सिद्धी शुगर अलाईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील शाळेचे प्राचार्य, शिक्षक व पालकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. “विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील आहे. शशांकचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे,” असे शाळा प्रशासनाने सांगितले.शशांक बिडवेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याची इस्रोमध्ये झेप: सहकार मंत्री ना बाबासाहेब पाटील यांच्या वतीने अभिनंदन







