श्रीरामपूर : खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल निमगाव खैरी विद्यालयाला प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय परसबाग निर्मितीमध्ये श्रीरामपूर तालुक्यात प्रथम क्रमांकाचे ११ हजारांचे पारितोषिक मिळाले. शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण १५५ शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. संस्थेचे सचिव अविनाश आदिक, गव्हर्निंग कौन्सिल सदस्या अनुराधा आदिक, सहसचिव अॅड. जयंत चौधरी व सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक शंकरराव शिंदे, सहशिक्षक बाळासाहेब बनकर व शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेत प्रशस्त परसबाग फुलवली. त्यासाठी पालक, ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले.
निमगाव खैरी विद्यालयातील परसबागेत वांगे, मिरची, शेवगा, कढीपत्ता, कोबी, फ्लॉवर, टॉमेटो, पालक, मेथी, भोपळा, वाटाणा, कोथिंबीर, कांदा, लसुण, दोडका, घोसाळे, पुदिना, गवती चहा, अडुळसा आदी देशी पालेभाज्यांची व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. यातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या रोपांची व झाडांची प्रत्यक्ष माहिती मिळाली. कोणत्या भाजीतून कोणते पोषक घटक मिळतात यांचीही माहिती झाली.
जल व्यवस्थापन, गांडुळ खत निर्मिती, कंपोस्ट खत प्रकल्प, पाण्याचा पुनर्वापर, ठिबक तुषार सिंचन, टाकाऊ पदार्थांपासून खतनिर्मिती, इको क्लब उपक्रम, पर्यावरण विषयक जनजागृती आदी उपक्रम विद्यालयात राबविण्यात येतात.
परसबागेतील सर्वच भाजीपाला हा सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला असल्यामुळे दैनंदिन पोषण आहारामध्ये त्याचा दररोज समावेश केला जातो. विद्यालयाच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, विस्ताराधिकारी श्री. त्रिभुवन, केंद्रप्रमुख श्री. पिलगर, केंद्र समन्वयक श्री. पटारे यांच्यासह पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आदींनी कौतुक केले आहे.
परसबाग निर्मिती स्पर्धेत निमगाव खैरी विद्यालय प्रथम







