नेवासा : नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे हनुमान जयंती निमित्त गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व ह भ प सुखदेव महाराज मुंगसे आणि ह भ प सदाशिव महाराज पुंड यांच्या अधिपत्याखाली दिनांक 26 मार्च पासून गेल्या सात दिवसांपासून भक्तीमय वातावरणात सुरू असलेल्या श्री. हनुमंतरायाच्या अखंड हरिनाम सप्ताहाची ह.भ.प. जंगले महाराज शास्त्री यांच्या सुश्राव्य अशा काल्याच्या कीर्तनाने अत्यंत उत्साहामय वातावरणात 3 एप्रिल रोजी सांगता झाली. या सोहळ्याला परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी आणि कीर्तनासाठी अलोट गर्दी केली होती.
शेवटच्या दिवशी फटाक्याच्या आतषबाजी मध्ये व टाळ मृदुंगाच्या,हरिनामाच्या गजरात गावामध्ये मिरवणूक पार पडली. यामध्ये मुलींच्या डोक्यावरील कलश आकर्षण ठरले.
श्री. हनुमंतरायाच्या चरणी आयोजित या अखंड हरिनाम सप्ताहात सलग सात दिवस काकड आरती, जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज गाथा पारायण , भजन, हरिपाठ, प्रवचन आणि सायंकाळी नामवंत कीर्तनकारांची कीर्तने असा भरगच्च धार्मिक कार्यक्रम पार पडला. ‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’ आणि ‘जय बजरंगबली’च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई व फुलांच्या माळाची सजावट करण्यात आली होती.सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच सांगतेच्या निमित्ताने श्री.क्षेत्र डोंगरगण संस्थेचे मठाधिपती ह.भ.प. गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
कीर्तनाच्या उत्तार्धात पारंपारिक पद्धतीने दहीहंडी फोडण्यात आली. यानंतर ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या गजरात उपस्थितांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. परिसरातील आणि पंचक्रोशीतील हजारो आबालवृद्धांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. सप्ताहाच्या निमित्ताने दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या अखंड हरिनाम सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी बजरंग दल, बालाजी भजनी मंडळ,आयोजक मंडळ, देवगड भक्त मंडळ, श्री. दत्त दिगंबर भक्त मंडळ, आणि समस्त ग्रामस्थ,भाविकांनी विशेष परिश्रम घेतले. अतिशय खेळीमेळीच्या आणि भक्तीमय वातावरणात या सप्ताहाची सांगता झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नेवासा प्रतिनिधीजंगले महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने हनुमंतरायाचा अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता







