लोणी : प्रवरा मेडिकल ट्रस्ट संचालित डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे वडगावपान येथील ऍसिड हल्ल्यातील जखमी रुग्णाची राज्याचे मंत्री सुनील तटकरे यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
वडगावपान येथे घडलेल्या धक्कादायक ऍसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडितेवर सध्या लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री तटकरे यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेची प्रत्यक्ष भेट घेतली व तिच्या आरोग्याविषयी माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली.
यावेळी त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून पीडितेला सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना दिल्या. तसेच आवश्यक ती सर्व शासकीय मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
घटनेबाबत प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले. या भेटीदरम्यान रुग्णालयातील अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
लोणी येथे ऍसिड हल्ल्यातील पीडितेला मंत्र्यांची भेट; प्रकृतीची केली विचारपूस







