दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, अन्नधान्य व चाऱ्याच्या नियोजनास प्रथम प्राधान्य द्यावे – मंत्री छगन भुजबळ
आढावा बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना
येवला – दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यास प्रथम प्राधान्य द्यावे.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करून संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येवला संपर्क कार्यालयात येवला मतदारसंघातील दुष्काळग्रस्त परिस्थिती व विविध विकास कामांची आढावा बैठक येवला संपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, संभाजी पवार, जयदत्त होळकर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाड प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे, तहसीलदार आबा महाजन, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, निफाड गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हिमांशु चव्हाण, पोलिस उपअधीक्षक रोशन पंडित, पोलिस निरीक्षक किरण शिंदे, संदीप मंडलिक, मोहन शेलार, दत्ता निकम, सचिन कळमकर, सुनील पैठणकर, भगवान ठोंबरे, देविदास निकम, भागीनाथ पगारे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, यंदाच्या वर्षी पावसाची तूट आणि दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच प्रभावी नियोजन करावे. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करावा, पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, अशा परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि इतर पाणीस्रोतांचे सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार अधिग्रहणाची कार्यवाही करावी. अधिग्रहित पाणीस्रोतांचा वापर प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात यावा. तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती तपासून संभाव्य टँकर मागणीचा आढावा घ्यावा आणि आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.





