- पोलिसांनी जनतेत जाऊन संवाद साधावा
श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर हे राज्यातील सलोख्यासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. अधून मधून काही घटना घडत असल्या तरी त्याचा एकूण समाजावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व शहरवासीयांनी आपसातील सलोखा व शांतता कायम राखावी. पोलीस प्रशासन सर्व बाबींवर नजर ठेवून आहे. आपसातील संवाद वाढवण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने शहराच्या वेगवेगळ्या भागात जाऊन जनतेशी संवाद साधावा त्यांच्या भावना त्यांच्या समस्या त्यांचे प्रश्न समजून घ्यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.श्रीरामपूर शहरातील श्रीराम नवमी उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून शहरात या वेगवेगळ्या घटना घडत असल्याने शहरात अशांततेचे वातावरण तयार झाले. त्यामुळे उत्सवावर विरजण पडून दोन समाजात दुफळी निर्माण होऊन शहराला एक वेगळे वळण लागले. त्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दोन्ही समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची वेगवेगळ्या बैठका घेऊन मते आजमावली. त्यामुळे श्रीरामपूर शहरातील पूर्वी जसे एकोप्याचे वातावरण होते तसे पुन्हा होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील दोन्ही बाजूंनी मत आजमावून घेतले. मात्र या एकोप्यासाठी पोलिसांची भूमिका काय असेल हे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट न केल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आणि यापुढे न्याय कोणापुढे मागावा असा प्रश्नही पडला आहे.यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक धनवडे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप उपस्थित होते.प्रथम हिंदू समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची बैठक बोलावली. यात श्रीराम नवमी काळात अशा प्रकारचे वातावरण तयार झाल्यामुळे यात व्यापारी वर्ग भरडला जातो त्यामुळे आर्थिक नुकसान होत असते. श्रीराम झेंडा मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी, श्रीरामपूर शहरातील अशा वातावरणात पोलिसांनी पुढाकार घेऊन यातून मार्ग काढावा, अशा एक ना अनेक मुद्दे मांडून गौतम उपाध्ये, जीवन सुरुडे, रितेश एडके, अशोक बागुल, लकी सेठी, किशन ताकटे, बाबा शिंदे, सचिन गुजर, रमादेवी धीवर, आदींनी आपली भूमिका विषद केली.मुस्लिम समाजाच्यावतीने केवळ एकाच समाजाला टार्गेट केले जात आहे, दगडफेक कोणी केली याबाबत सीसीटीव्ही फुटेज पाहून जो कोणी दोषी असेल त्याच्याविरुद्ध कारवाई करावी, आम्ही त्या घटनेचा निषेध करतो, जमाव गोळा करून कोणी दबाव आणत असेल तर पोलिसांनी कायद्याचे काम केले पाहिजे. जो कोणी शहराच्या शांततेला गालबोट लावत असेल तर याचा शोध घेतला पाहिजे. शहराच्या सलोख्याची उदाहरण राज्यात दिली जात होती परंतु अलीकडे घडलेल्या घटनांमुळे शहराची शांतता व सुव्यवस्था बाधित झाली आहे, अशी ॲड. समिन बागवान, मुख्तार शहा, सलीमखान पठाण, अहमदभाई जहागिरदार, महबूब कुरेशी, साजिद मिर्झा, फिरोज शाह यांनी मते मांडली.








