नेवासा : वैशाख शुद्ध एकादशीच्या पावन निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात मंगळवार सायंकाळी सहा वाजता पवित्र पैस खांबाची भव्य महाआरती मोठ्या भक्तिभावात पार पडली. या महाआरतीसाठी साखर कामगार हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. जगधने सर व त्यांच्या पत्नी यांच्या शुभहस्ते विधी संपन्न झाला. मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती आणि संपूर्ण वातावरण हरिनामाच्या गजराने भारावून गेले होते.
या प्रसंगी डॉ. जगधने यांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी २० किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला. मंदिराचे महंत देविदास बाबा म्हस्के, विश्वस्त मंडळ तसेच संपर्क अधिकारी आशिष कावरे यांच्या हस्ते डॉ. जगधने यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. महंत देवीदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या एकादशी महाआरती उपक्रमाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, माऊली भक्तांकडून या उपक्रमाचे कौतुक व्यक्त होत आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. जगधने म्हणाले की, महाआरतीनंतर त्यांना साक्षात माऊलींचे दर्शन झाल्याची अनुभूती मिळाली. “माऊलींनी मला आदेश दिल्यासारखे वाटले की, यापुढे माझ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून वारकरी भक्तांना मोफत उपचार द्यावेत. हा माझ्यासाठी अत्यंत भाग्याचा क्षण आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, मंदिर समितीच्या वतीने वै गुरुवर्य बन्शी महाराज तांबे यांच्या आशीर्वादाने आणि मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने सुरू करण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज प्राथमिक उपचार केंद्रासाठीही डॉ. जगधने यांनी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमास औटी साहेब, शिवाजी होन, बनकर साहेब, अनंत नळकांडे, डॉ. शंकर शिंदे, डॉ. भाऊसाहेब घुले, डॉ. सांगळे मॅडम, डॉ. देशमुख, डॉ. नांदे, डॉ. निलेश लोखंडे, डॉ. थोरात, डॉ. योगेश परदेशी, डॉ. गणेश गरुटे, सतीश पिंपळे, निलेश जोशी, महेश मापारी, संजय सुकलकर, कारले सर, अनिल शिंदे, रवी जमधडे, विष्णू जाधव तसेच माऊली भक्त आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैशाखी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पवित्र पैस खांबाची महाआरती; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद







