कोपरगाव( गौरव डेंगळे) : महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन व नाशिक जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे दिनांक ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या. राज्यभरातील सर्व जिल्हा संघांच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली होती.
या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी कोपरगावच्या असलेल्या सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचा होतकरू खेळाडू सार्थक सोनवणे याची अहिल्यानगर जिल्हा संघात निवड झाली होती. स्पर्धेदरम्यान सार्थकने आपल्या उत्कृष्ट खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या वेगवान खेळशैली,अचूक पासिंग आणि निर्णायक क्षणी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे संघाला मोठा फायदा झाला.
सार्थकच्या या यशामागे त्याची जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि बास्केटबॉल प्रशिक्षक गणेश मोरे व गणेश वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्थकने आपल्या कौशल्यात सातत्याने प्रगती केली असून, भविष्यात तो आणखी मोठ्या स्तरावर चमकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.सार्थकच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोमैया ट्रस्टचे अध्यक्ष समीर सोमैया,गोदावरी बायो रिफायनरीचे सुहास गोडगे साहेब,शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोपरगावसाठी अभिमानास्पद ठरलेल्या या यशामुळे शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून,इतर विद्यार्थ्यांसाठीही सार्थक प्रेरणास्थान ठरत आहे.
कोपरगावच्या सार्थक सोनवणेचा राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत दमदार ठसा…








