शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

विखे पाटील कारखान्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा

---Advertisement---

प्रवरेचा कामगार हा आपला अभिमान

  • माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील


लोणी: प्रवरा सहकार, औद्योगिक व शैक्षणिक समूहाच्या विकासात कामगारांचे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या कष्टांमुळेच प्रवरा आज भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे “प्रवरेचा कामगार हा आपल्या संस्थेचा अभिमान आहे,” असे प्रतिपादन माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सुरू झालेली ही गौरवपरंपरा आजही कायम राखली जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, साखर कामगार सभेचे ज्ञानदेव आहेर, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे, सर्व संचालक मंडळ तसेच कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
म्हस्के पाटील पुढे म्हणाले की, कोणतीही संस्था कामगारांच्या कष्टांवर उभी असते. सेवानिवृत्तीनंतरही आनंदी जीवन जगावे, सामाजिक कार्यात सहभागी व्हावे आणि कुटुंबाला वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी करत सेवापूर्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, प्रवरेच्या वाटचालीत कामगारांचे योगदान निर्णायक राहिले असून त्यामुळेच ‘प्रवरा पॅटर्न’ राज्यभर वेगळी ओळख निर्माण करू शकला. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यात कामगारांनी मोठा वाटा उचलला आहे.
ते पुढे म्हणाले की, साखर उद्योगासमोर सध्या अनेक आव्हाने असली तरी कामगारांच्या हिताला बाधा येणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. कामगारांनी दिलेले योगदान हे प्रवरेच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. भविष्यातील निर्णय घेताना कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी ज्ञानदेव आहेर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार संचालक अशोक घोलप यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment