श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी दुपारी अचानक झालेल्या या पावसामुळे उन्हामुळे हैरान झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पण त्याचवेळी शेतात उभ्या पिकांचे चांगलेच नुकसान झाले. श्रीरामनवमीनिमित्त सुरू असलेल्या जत्रांमध्ये नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यात मोठी गारपीट झाली. यामुळे रस्त्यांवर गारांचा खच पडल्याचे दिसून आले. सखल भागांत पाणी साचल्याचेही दिसून आले. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे शहरात दुपारच्यावेळीच अंधार झाल्याचे चित्र होते. जवळपास अर्धा तास ही स्थिती होती. या अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. त्यांनी मिळेल तिथे आसरा घेऊन स्वतःचा पावसापासून बचाव केला. यातच श्रीरामनवमीच्या निमित्ताने सुरू असलेल्या यात्रेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात आजपासून 4 एप्रिलपर्यंत ढगाळी वातावरण व दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवे सत्र सुरू होणार आहे. त्यात प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो.
30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. पण या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान व वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळी वातावरण, दुपारनंतरचा वादळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.








