शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

गुणवंतांचा गौरव; प्रवरा शिक्षण संस्थेचा यशोत्सव दिमाखात

---Advertisement---

अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री तसेच प्रवरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशाचा अभिमान

सोनगाव : ग्रामीण भागात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून शिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात गुणवत्तेचा भव्य सोहळा अनुभवायला मिळाला. संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे ज्येष्ठ नेते,पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री तसेच प्रवरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचे, पालकांचे आणि संपूर्ण ग्रामीण भागाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि कर्तृत्वाचा गौरव करताना सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने प्रवरा शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या विचारांचा वारसा पुढे नेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी संस्थेचा विस्तार करून शिक्षण क्षेत्रात नवे मानदंड निर्माण केले. काळाच्या बदलत्या प्रवाहानुसार आधुनिक शिक्षण पद्धती स्वीकारत संस्थेने गुणवत्ता, संस्कार आणि कौशल्य विकासाचा आदर्श पॅटर्न उभा केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील योग्य दिशा, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या शर्यतीत न अडकता सामाजिक बांधिलकी, संस्कार, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेची भावना जोपासत आयुष्यात उच्च शिखरे गाठावीत, अशा प्रेरणादायी शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
या प्रसंगी माजी मंत्री तथा संस्थेचे विश्वस्त श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील, सौ. शालिनी विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशाचा हा सोहळा केवळ सत्कारापुरता मर्यादित न राहता शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची परंपरा अधिक बळकट करणारा ठरला. प्रवरा शिक्षण संस्थेच्या रूपाने उभा राहिलेला गुणवत्तेचा दीपस्तंभ आजही ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देत असल्याची भावना यावेळी सर्वांच्या मनात दाटून आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment