नगरच्या अध्यात्मिक गायनाचा आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे नाशिकमध्ये गौरव
अहिल्यानगर – येथील प्रथितयश युवा गायक गिरीराज जाधव यांना आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनतर्फे नाशिक येथे ‘अनसंग एव्हरीडे हीरोज’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नाशिकचे पोलिस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) बाळासाहेब पाटील आणि विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा 70 वा वाढदिवस आणि आर्ट ऑफ लिव्हिंगची 45 वर्षांची पूर्तता या निमित्ताने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संपूर्ण देशभर करण्यात आले होते.उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमधून (नगर, धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार) एकूण 10 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यात नगर शहरातून एकमेव पुरस्कार जाधव यांना मिळाला आहे.
युथ लिडरशिप कॅटेगरीमध्ये मिळालेल्या या पुरस्काराचचं श्रेय ते गुरुदेव श्री श्री रविशंकर आणि मीरा पाटील, मानसिंग पाटील यांना देतात. मागील 16 वर्षांपासून गिरीराज जाधव दर गुरुवारी मीरा पाटील यांच्या नगरमधील टायनी टॉट नर्सरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना भजन शिकवण्यासाठी जातात. संस्कार आणि मूल्य हे लहान वयातच मुलांना मिळायला हवेत या हेतूने चालू केलेला हा उपक्रम आता एक चळवळ बनली आहे. अध्यात्मिक गीत गायनाबरोबरच विविध शैलीतील गायनात जाधव यांचा हातखंडा आहे. या पुरस्काराबद्ल जाधव यांचे विविध क्षेत्रांतून कौतूक होत आहे. नाशिक येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात विजय हाके, उमेश मराठे, स्वामी आनंद वैशंपायन उपस्थित होते.







