नेवासा : नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत नूतन विस्तार अधिकारी भागिनाथ बडे, नूतन केंद्रप्रमुख भास्कर तांबे तसेच अंबादास बोरुडे सर यांची तेलकुडगाव येथे मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. शिक्षकी पेशातून प्रशासकीय सेवेत पदार्पण करणाऱ्या या अधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमामुळे परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे यांनी भूषवले.
या प्रसंगी नूतन विस्तार अधिकारी भागिनाथ बडे, नूतन केंद्रप्रमुख भास्कर तांबे व मुख्याध्यापक अंबादास बोरुडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सत्काराला उत्तर देताना भागिनाथ बडे यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “प्रशासकीय कामात पारदर्शकता राखून केंद्र व तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आम्ही कटिबद्ध राहू.” तसेच इतर अधिकाऱ्यांनीही शिक्षण क्षेत्रात समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
याच कार्यक्रमात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभही पार पडला. विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त करत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली व शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगामुळे कार्यक्रमात भावनिक वातावरण निर्माण झाले.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून पदोन्नती मिळालेल्या तिन्ही अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी उपसरपंच महादेव पुंड, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, व्हाईस चेअरमन जनार्धन देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत ससाने, मुख्याध्यापक सतीश भोसले, सहशिक्षक संभाजी कडू, मुंगसे मॅडम, कदम मॅडम, काळे मॅडम तसेच इतर शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शिक्षकाच्या मेहनतीचे फळ म्हणजे पदोन्नती होय. या नवीन जबाबदारीमुळे केंद्रातील शैक्षणिक दर्जा निश्चितच उंचावेल,” असे प्रतिपादन मुख्याध्यापक सतीश भोसले यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सावंत यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन संभाजी कडू यांनी मानले. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली
शिक्षक ते प्रशासकीय अधिकारी : देडगावात केंद्र शाळेच्या वतीने पदोन्नतीचा सन्मान सोहळा







