मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मानवी दृष्टीकोनातून आपल्या हयात असलेल्या सर्व माजी सेवकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी संवेदनशील निर्णय घेतला आहे. बँकेत निष्ठेने व प्रामाणिकपणे सेवा बजावलेल्या निवृत्त सेवकांना वृध्दापकाळात उदभवणा-या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य बँक माजी सेवक आधार योजना लागू करण्यास 16 एप्रिल 2026 च्या प्रशासकीय सभेत मान्यता देण्यात आली आहे.
वृध्दापकाळात कर्करोग, मुत्रपिंड निकामी होणे, मेंदुचा पक्षघात, यकृत निकामी होणे, पार्किन्सस, क्षयरोग आदि गंभीर आजारांवर दीर्घकालीन व खर्चिक उपचार करावे लागतात. सेवा निवृत्तीनंतर उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित असल्याने, अशा उपचारांचा आर्थिक भार मोठा ठरतो. ही बाब लक्षात घेऊन बँकेने ही योजना आपल्या माजी सेवकांना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत गंभीर आजार असलेल्या पात्र माजी सेवकांना सेवक कल्याण निधीतून दरमहा रु.5,000/- इतके आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या मदतीमुळे निवृत्त सेवकांना औषधोपचारासाठी आवश्यक आर्थिक आधार मिळणार असून, बँकेची कर्मचारी हिताची परंपरा अधिक बळकट होणार आहे. बँकेच्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत असून, माजी सेवकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी बँकेचा हा पुढाकार अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे.
या व्यतिरिक्त माजी सेवकांना त्यांच्यावरील शस्त्रक्रियेपोटी येणा-या खर्चासाठी बँक पूर्वीपासून आर्थिक सहाय्य करीत असून, आरोग्य आधार योजने व्यतिरिक्त शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्य करण्याची योजना पुर्वीप्रमाणेच पुढे चालू राहणार आहे. या संदर्भात गरजू माजी सेवकांना बँकेच्या मुंबई येथील कार्यालयाशी अथवा राज्यातील बँकेच्या सर्व विभागीय कार्यालयांशी संपर्क करावा, असे आवाहन बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी पत्राद्वारे केले आहे.
राज्य सहकारी बँकेचा माजी सेवकांसाठी गंभीर आजारांच्या उपचारांसाठी दरमहा रु.5000/- पर्यंत आर्थिक मदत







