- नगराध्यक्ष ससाणे यांनी घेतली रेल्वे अधिकाऱ्यांची भेट
श्रीरामपूर : रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटविण्याच्या प्रस्तावित कारवाईला तात्पुरता दिलासा मिळाला असून ही मोहीम आठ दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष करण ससाणे यांनी काल रेल्वेच्या पुणे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
शहरातील सय्यदबाबा दर्ग्याच्या पाठीमागील रस्ता आणि रेल्वे रूळ यांदरम्यानच्या परिसरातील अतिक्रमणांबाबत रेल्वे प्रशासनाने दवंडी देत आज सोमवार दिनांक ६ एप्रिलपासून कारवाई सुरू करण्याची तयारी केली होती. संबंधित जागेचे रेखांकनही अधिकाऱ्यांनी पूर्ण केले होते. यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक रईस जहागिरदार यांच्या निवासस्थानी नगराध्यक्ष ससाणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि आमदार हेमंत ओगले यांच्या पुढाकारातून अतिक्रमणधारकांना मुदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले. रेल्वे अधिकाऱ्यांनी बेलापूर रेल्वे स्थानकात चर्चेचे आश्वासन दिल्यानुसार आज बैठक पार पडली.
या बैठकीत वरिष्ठ अभियांत्रिकी निरीक्षक पैठणकर यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. चर्चेदरम्यान खासदार वाकचौरे यांच्याशी अधिकाऱ्यांचे दूरध्वनीवरून संभाषणही झाले. त्यानंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई पुढील आठ दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, या प्रश्नावर अंतिम तोडगा काढण्यासाठी गुरुवारी खा. वाकचौरे व आमदार हेमंत ओगले यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीकडे अतिक्रमणधारकांचे लक्ष लागले आहे.







