लोणी :ज्ञानसाधना, अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर दौंड येथील डॉ. बबन सुरेश माने यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत वाणिज्य विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्राप्त केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने त्यांना ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्रदान करण्यात आली.डॉ. माने यांनी “पुणे महानगरपालिकेमार्फत राबविण्यात आलेल्या निवडक कल्याणकारी योजनांचा परिणाम अभ्यास” या सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन करून आपला शोधप्रबंध सादर केला. यासाठी त्यांना लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. दिघे उपप्राचार्य डॉ. आर. ए. पवार डॉ. व्ही. बी. बैरागी, डॉ. बी. डी. रणपिसे यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे, डॉ. माने यांनी शिक्षण क्षेत्रात बहुआयामी प्रगती साधली असून त्यांच्या नावावर बँकिंग विषयातील वाणिज्य पदवी, विपणन विषयातील वाणिज्य पदवी, वाणिज्य पदव्युत्तर पदवी, वित्त व्यवस्थापन विषयातील व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी, मानव संसाधन व्यवस्थापन विषयातील व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी, अर्थशास्त्र विषयातील कला पदवी, अर्थशास्त्र विषयातील कला पदव्युत्तर पदवी, कर कायदा पदविका, शासन लेखा व प्रशासकीय पदविका तसेच शिक्षणशास्त्र पदवी अशा विविध पदव्या आहेत.त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे आदींनी अभिनंदन केले आहे.
प्रवरेच्या डाॅ. बबन माने यांना वाणिज्य विषयात विद्यावाचस्पती पदवी प्रदान







