श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : येथील रा.ब.नारायणराव बोरावके कॉलेजमध्ये “ ग्रंथालय विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : जीवन व कार्य” या विषयावर विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन रयत शिक्षण संस्था मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले.या प्रदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, शैक्षणिक कार्य, सामाजिक परिवर्तनातील योगदान, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीतील भूमिका तसेच त्यांच्या विचारसरणीवर आधारित विविध ग्रंथ, संदर्भ पुस्तके, चरित्रे, दुर्मिळ साहित्य, छायाचित्रे आणि नियतकालिकांचा समावेश करण्यात आला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास व संशोधन करण्याची मौल्यवान संधी उपलब्ध झाली. ग्रंथालय विभागाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढीस लागून त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीवा अधिक बळकट होण्यास मदत होईल.याप्रसंगी मीनाताई जगधने यांनी सदर उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रो. डॉ. प्रवीण बडधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य, प्रो. डॉ. अनुप दळवी व प्रो. डॉ. शरद शेळके यांची विशेष उपस्थिती लाभली.त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा, प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे यांचे व्याख्यान, सलग अभ्यास अभियान, ग्रंथ प्रदर्शन व निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला, डॉ. अशोक माहुरे, डॉ. योगिता रांधवणे, डॉ. योगिता बागुल, डॉ. अर्जुन आनंदकर, प्रा. शंकर मुंडे, राजेंद्र शिंदे, संतोष वडणे, बाळू जाधव, मदन शिंदे तसेच विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोरावके महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन उत्साहात संपन्न







