श्रीरामपूर : महसुली न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले जमिनीविषयक दावे जलदगतीने निकाली काढण्यासाठी शासनाने ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत श्रीरामपूर तालुक्यात मंगळवारी (दि. २७) रोजी विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महसूल न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणांमुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. ही बाब लक्षात घेऊन शासनाने १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत अभियान राबविण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये दाव्यांची तडजोडीने आणि परस्पर संमतीने जलद निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे.
दरखास्त दावे, रस्ता वहिवाटीचे दावे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १४३ अन्वये प्रकरणे, मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६ मधील कलम ५(२) अंतर्गत दावे, वारस नोंदी, अधिकार अभिलेख, ज्येष्ठ नागरिकांच्या निर्वाह व कल्याण अधिनियमांतर्गत प्रकरणे तसेच वाटपाची प्रकरणे यांचा यात समावेश आहे.
श्रीरामपूर तहसील कार्यालयात सुरू असलेल्या संबंधित प्रकरणांतील नागरिकांनी (पक्षकारांनी) २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, श्रीरामपूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केले आहे. या अभियानामुळे प्रलंबित महसुली वादांना सामंजस्यातून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.





