अहिल्यानगर : “आजचे वैद्यकशास्त्र केवळ रुग्णालयांपुरते मर्यादित राहिलेले नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विविध विद्याशाखांमध्ये त्याची व्याप्ती वाढत आहे. वैद्यकशास्त्राचे भविष्य केवळ प्रयोगशाळांमध्ये नाही, तर व्यक्तींच्या मनात आणि कृतीमध्ये घडते. वैद्यकशास्त्राच्या केंद्रस्थानी एक आध्यात्मिक सेवाभाव दडलेला आहे, हे कधीही विसरू नका,” असा मोलाचा संदेश आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कर्करोगतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. दत्तात्रेयुडू नोरी यांनी दिला.
पद्मश्री डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या एमबीबीएस महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या २३ व्या बॅचच्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ‘लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठा’तील पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात डॉ. नोरी बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, वसंतराव कापरे, नंदकुमार झावरे, सुभाष पाटील, उत्तमराव कदम, सुभाषराव भदगले, विनायकराव देशमुख, डॉ. अभिजित दिवटे, डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ. नोरी म्हणाले की, “आज तुम्ही एका उदात्त व्यवसायात प्रवेश करीत आहात. हे भविष्य तुमच्या बुद्धिमत्तेची, नैतिक मूल्यांची, सहानुभूतीची आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेची कसोटी पाहणारे आहे. आजचे वैद्यकीय शिक्षण हे संगणकीय तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि मानवाप्रती असलेली करुणा यांचा संगम घडवून आणणारी एक नवी उपचार पद्धती म्हणून विकसित झाले आहे.”
आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील कारकिर्दीचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडताना डॉ. नोरी म्हणाले की, “मैं जेव्हा कर्करोगावरील उपचार पद्धतीला सुरुवात केली, तेव्हा प्रामुख्याने रोगाचे निदान करणे, शस्त्रक्रियेने कर्करोगावर मात करणे व किरणोत्सर्गाद्वारे कर्करोगाच्या पेशी नष्ट करणे अशी उपचार पद्धती होती. परंतु आजचे कर्करोगशास्त्र अधिक भविष्यवेधी, प्रतिबंधात्मक आणि प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार वैयक्तिक स्वरूपाचे बनले आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनुकीय माहितीचे विश्लेषण करून, रुग्णाच्या केवळ आजारानुसार नव्हे, तर त्याची जैविक वैशिष्ट्ये, जीवनशैली आणि सामाजिक-आर्थिक परिस्थितीनुसार अचूक औषधोपचार सुचविणारे तंत्रज्ञान असेल.”
“वैद्यकीय शास्त्रात तंत्रज्ञान आले असले तरी रुग्णाची जीवनकहानी कधीही विसरू नका,” असे सूचित करून ते म्हणाले की, प्रत्येक वैद्यकीय अहवालामागे एक मानवी जीवन असते, कुटुंबाचे आणि रुग्णाचे भविष्य दडलेले असते. त्यामुळेच भविष्यातील डॉक्टरांना जीवशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, सहानुभूती आणि अभियांत्रिकी विज्ञानाबरोबरच मानवी मूल्यांना समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. उत्कृष्ट वैद्यकीय सेवा केवळ मोठ्या आणि नामांकित रुग्णालयातच दिली जाते असे नाही, तर जिथे खरी वैद्यकीय सेवा आवश्यक आहे तिथे नेहमीच सकारात्मक प्रतिसाद द्या. प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा सेवा करणारे हात अधिक पवित्र असतात. प्रत्येक रुग्णाची भेट म्हणजे मानवी रूपातील परमेश्वराची सेवा करण्याची संधी आहे, या भावनेतून पुढे जाण्याचा सल्ला डॉ. नोरी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
जलसंपदा मंत्री तथा डॉ. विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी, आज आपण सर्व जण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असल्याचे सांगितले. “राज्यातील पहिल्या खासगी ग्रामीण विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आपण उपस्थित आहोत. विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा २३ वर्षांचा प्रवासही तितकाच महत्त्वपूर्ण राहिला आहे. विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण करता आले, याचे मोठे समाधान आहे. या महाविद्यालयात प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी आता आमच्या परिवारात आले असून, कुटुंबाप्रमाणे त्यांचे पालकत्व आम्ही स्वीकारले आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी लवकरच हेल्पलाईन नंबर सुरू करणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.
“आजच्या समारंभास डॉ. नोरी यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यक्तिमत्त्व आपल्यामध्ये उपस्थित आहे, याचे मोठे समाधान आहे. शिर्डीचा संदेश घेऊन त्यांनी न्यूयॉर्क येथे साईमंदिर उभारले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विखे पाटील फाउंडेशन आणि नव्याने स्थापन झालेले विद्यापीठ हे देशात नक्की अग्रस्थानी येईल,” असा विश्वास मंत्री ना. विखे पाटील यांनी व्यक्त केला.
कोट:
“मी विविध संस्थांशी जोडलेला असलो तरी माझे मन भारताशी घट्ट जोडलेले आहे. विखे पाटील फाउंडेशनच्या कर्करोग रुग्णालयातून जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. शिर्डी येथील साईबाबांवरील माझा विश्वास हा माझा नैतिक दिशादर्शक आणि माझ्या शक्तीचा स्रोत राहिला आहे. निःस्वार्थ सेवा, नम्रता आणि सर्व जीवांप्रती प्रेम या मूल्यांनी मला नेहमीच मार्गदर्शन केले आहे.”





